विलवडे स्थानकावर कोकण रेल्वे स्थापना दिवस आगळ्या पद्धतीने

लांजा : कोकण रेल्वेचा स्थापना दिवस राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने विलवडे स्थानकावर आगळ्या पद्धतीने साजरा केला.

प्रा. मधू दण्डवते, जॉर्ज फर्नांडिस आणि ई श्रीधरन यांच्या कर्तृत्वाने साकारलेली कोकण रेल्वे लवकरच कोकणवासीयांची जीवनवाहिनी ठरली. सुरक्षित आणि आरामदायी प्रवास म्हणून कोकण रेल्वेच्या गाड्या प्रवाशांनी ओसंडून जाऊ लागल्या. आता एकेरी रेल्वेमार्गाचे रुंदीकरण करण्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोकण रेल्वेच्या निर्मितीत महाराष्ट्राचे ७० टक्के योगदान आहे. लोकसहभागातून उभारलेल्या निधीत धनवंतांबरोबरच कोकणातील सामान्य चाकरमान्यानेही त्याच्या त्यावेळच्या ऐपतीप्रमाणे बॉंण्ड विकत घेऊन आपली कोकण रेल्वेची मागणी अधोरेखित केली. स्थानिक जमीनदारांनी आपापल्या जमिनी हस्तांतरित केल्या. आर्थिक मोबदल्याबरोबर काही जणांना रेल्वेत नोकरीची संधीही मिळाली. अनेक अभियंते, ठेकेदार, कामगार यांनी भगीरथ प्रयत्न करून कोकणवासीयांचे स्वप्न साकार केले.

या अतिविशाल प्रकल्पावर काम करीत असताना अनेक कामगारांना त्यांच्या जिवाला मुकावे लागले. रेल्वे साकार झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वी रत्नागिरी स्थानकाबाहेरील हुतात्म्यांच्या स्मृतिस्तंभाला वंदन करून आदरांजली व्यक्त केली जाते, तर दुसऱ्या दिवशी १५ ऑक्टोबर हा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) या लोकाभिमुख सामाजिक संस्थेने कोकण रेल्वे स्थापना दिनाचे औचित्य साधून विलवडे रेल्वे स्थानकावर एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. स्वच्छता अभियानात सहभागी झालेल्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज, रिक्षा संघटनेचे उमेश पडीलकर, सुरेश शिगम, महेंद्र साळवी, चंद्रकांत खामकर, तुषार पालकर, स्टेशन प्रबंधक शिरीष जाधव, संजय करवीलकर, सावंत या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

रेल्वे आपली आहे. तिची स्वच्छता आणि सुरक्षितता ही आपली जबाबदारी आहे, हे लोकांमध्ये ठसविण्याचे कामही ही संघटना करते आहे. विलवडे स्थानकाच्या परिसरातील व्हेळ येथील रुक्मिणी भास्कर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्थानक परिसरात जाऊन स्वच्छता केली. तत्पूर्वी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे निमित्त साधून प्रवासी संघटना आणि रिक्षा संघटनेने यांनी स्वच्छता अभियान राबविले.

कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्थानकाशी जवळजवळ ६० गावे जोडली गेली आहेत. तेथे दिवा-सावंतवाडी, कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेस या गाड्या थांबतात. सणासुदीच्या काळात विशेष गाड्यांपैकी काही गाड्यांना तेथे थांबा दिला जातो. मात्र अनेक प्रवाशांना रत्नागिरी गाठावी लागते. विलवडे येथील प्रवाशांची संख्या लक्षात घेता तेथे मांडवी, जनशताब्दी, नेत्रावती या जलद गाड्यांना थांबा मिळावा ही तेथील प्रवाशांची मागणी आहे. याचबरोबर स्थानकावर वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, याकरिता विलवडे रेल्वे प्रवासी संघटना प्रयत्न करत आहे.

विलवडे रेल्वेस्थानकाची स्वच्छता करणाऱ्या रुक्मिणी भास्कर विद्यालय (व्हेळ) येथील मुलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करताना मान्यवर
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply