डॉ. काशिनाथ घाणेकरांवरील एकपात्री प्रयोगाला खेडच्या उर्दू भाषिकांचा प्रतिसाद

खेड : मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या रमेश भिडे यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगाला खेडमधील उर्दू भाषक रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

उर्दू भाषिक विद्यार्थी आणि मुस्लिम समाज मराठीप्रेमी आणि नाट्यप्रेमी आहे, हे आपल्या समाजाला कळावे, यासाठी रमेश भिडे यांचा हा प्रयोग आयोजित केला होता, अशी माहिती बज्म ए इमदादिया संस्थेचे अध्यक्ष आणि खेडच्या एमआयबी गर्ल्स हायस्कूलचे प्रमुख ए. आर. डी. खतीब यांनी दिली. प्रयोगाला खेड शहर आणि परिसरातील हिंदू-मुस्लिम धर्मातील नाट्यप्रेमी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.

शाळेल्या विद्यार्थी निधीसाठी हा नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला होता. उर्दू शाळा असूनही मराठी नाट्यप्रयोगच का सादर करावा असे वाटले, असे विचारल्यावर ते म्हणाले की, मी खेड तालुक्यातील कर्जी येथील आदर्श हायस्कूलमध्ये नोकरी करत असताना त्या काळात डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाचे अनेक प्रयोग खेडमध्ये व्हायचे. मला नाटके पाहायला खूप आवडायचे. स्थानिक पातळीवर काही नाटकांमध्ये मी काम ही केलेले आहे. त्यामुळे मी कर्जी येथून शिव मार्गे खेडला जवळच्या मित्रांसोबत रात्री चालत येऊन नाटके पाहायचो. त्या आठवणी मी कदापि विसरू शकत नाही.

डॉ. काशिनाथ घाणेकर चिपळूण येथील आणि आपल्या जिल्ह्यातील असल्याने त्यांच्याबद्दल आदर आणि अभिमान होता आणि आहे, असे सांगून श्री. खतीब म्हणाले की, ते दिवस खरेच मंतरलेले होते. नाटके पाहावीत तर ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांचीच, असा तो काळ होता. हा सिलसिला सुरू असताना डॉ. घाणेकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यामुळे संपूर्ण नाट्य जगतात एक पोकळी निर्माण झाली.

दरम्यान, रमेश भिडे यांनी डॉ. घाणेकर यांच्यावरील एकपात्री नाटक बसवले. त्याचा प्रयोग मी पुण्यात पाहिला होता. रमेश भिडे यांचे हे नाटक पाहून ते खेडला सादर करायचे, असे मी ठरवले होते. तीच खरी डॉ. घाणेकर यांना श्रद्धांजली ठरेल असे मला वाटले. त्यातून हा नाट्यप्रयोग खेडमध्ये आयोजित केला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली, याचे मला खूप समाधान वाटते. रमेश भिडे यांनीही हा प्रयोग ताकदीने सादर केला, असेही ते म्हणाले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply