ठाणे : येत्या २३ ऑक्टोबरपासून चतुरस्त्र घरंदाज शास्त्रीय गायक, चित्रपट अभिनेते, संगीत रंगभूमीवरील गायक नट, गुरू, तबलावादक, वाग्येयकार, संगीतकार संगीतभूषण पंडित राम मराठे यांची जन्मशताब्दी सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ठाणे येथे येत्या २२ ऑक्टोबर रोजी विशेष कार्यक्रम होणार आहे.
येत्या रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री साडेआठ वाजता घंटाळी (ठाणे पश्चिम) येथील सहयोग मंदिरच्या वातानुकूलित सभागृहात शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त संगीतभूषण पंडित राम मराठे फाउंडेशनच्या वतीने आयोजित आणि हिंदू जागृती सार्वजनिक श्री नवरात्रोत्सव मंडळ, नादब्रह्म, पितांबरी यांच्या सहकार्याने पं. राम मराठे यांचे नातू भाग्येश मराठे आणि त्यानंतर पं. राम मराठे यांचे पट्टशिष्य पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
लोकप्रिय अभिनेते, संगीतमय मैत्र आणि ज्यांना पंडित राम मराठे ह्यांचा खूप सहवास ,आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभलेले विघ्नेश जोशी निवेदन करणार आहेत. मान्यवर ज्येष्ठ-श्रेष्ठ साथसंगीत कलाकार तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित विश्वनाथ कान्हेरे, पंडित ओंकार गुलवाडी, सिद्धेश बिचोलकर आणि पं. राम मराठे यांचे पणतू अद्वैत केसकर यांची स्वरसंगत असणार आहे.
डॉ. विनय सहस्रबुद्धे, संदीप लेले, सुजय पत्की, ज्येष्ठ गायक पंडित वासुदेवबुवा जोशी, पंडित यशवंतबुवा वैद्य, मीनल जोगळेकर, पंडित सुरेश बापट असे अनेक ज्येष्ठ कलाकार आणि विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सर्व रसिकांना या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य आहे. अधिक माहितीसाठी मुकुंद मराठे (9892315731) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

