मुंबई : अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करताना मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ या संस्थेच्या कार्यालयाला महापालिकेने नोटीस देऊन ते सील केल्यामुळे संस्था गेल्या ४ वर्षांपासून बेघर झाली आहे. हे कार्यालय पुन्हा मिळावे, यासाठी संघाने धरणे आंदोलन केले.
गेल्या २०१६ पासून सर्वपक्षीय सत्ताधारी, पालिका प्रशासनातील अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाठीभेटी, पत्रव्यवहार करूनही आश्वासनापलीकडे कोणीही दाद घेत नव्हते. त्याविरोधात दाद मागण्यासाठी मुंबई-ठाण्यातील वृत्तपत्र लेखक जुने कार्यालय असलेल्या शिंदेवाडी महापालिका शाळेसमोर एकत्र आले. आमदार कालिदास कोळंबकर यांनी या धरणे आंदोलनाला तातडीने भेट दिली आणि संबंधितांशी संपर्क साधून कार्यालय पुन्हा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. माझ्या मतदारसंघातील जनसामान्यांचे प्रश्न निःस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे वर्तमानपत्रातून लिहिणारी महाराष्ट्रातील ही महत्त्वाची वृत्तपत्र लेखक चळवळ सुरू राहण्यासाठी मी तातडीने अगोदर मुंबई महापालिका आयुक्त आणि वेळप्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष रवींद्र मालुसरे, प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्यवाह नितीन कदम, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, माजी अध्यक्ष विजय ना. कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक कृष्णा काजरोळकर, मनमोहन चोणकर, कृष्णा ब्रीद, प्रकाश बाडकर, सूर्यकांत भोसले, दिलीप ल सावंत, गुरुनाथ तिरपणकर, दिगंबर चव्हाण, विवेक तवटे, राजन देसाई, अब्बास अत्तार, चंदन तावडे, रामचंद्र जायसवाल, दिलीप दळवी, दादासाहेब येंधे, अर्जुन जाधव, प्रशांत भाटकर, रमेश पालकर आदी वृत्तपत्र लेखक उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

