रत्नागिरी : ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन येत्या १९ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होत आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्रातील ५११ ग्रामपंचायतींमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायती अशा – शिरगाव, नाचणे (ता. रत्नागिरी), खेर्डी, सावर्डे (ता. चिपळूण). पालशेत (ता. गुहागर), उमरोली (ता. मंडणगड), जालगाव (दापोली), भरणे (ता. खेड), सागवे (ता. राजापूर), भांबेड (ता. लांजा) आणि कडवई (ता. संगमेश्वर).
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत आज पूर्वनियोजन आढावा बैठक झाली. जिल्ह्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्वच यंत्रणांनी सज्ज होऊन काटेकोर नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. ते कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्षही आहेत.
जिल्हाधिकारी म्हणाले, ज्या गावात हे केंद्र सुरू होणार आहे, त्याच्या परिसरातील गावांतील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध घटकांना यामध्ये सहभागी करून घ्यावे. या केंद्रांची माहिती या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. संबंधितांनी अधिकाधिक व्यक्तींपर्यंत कौशल्य विकास केंद्रांची आणि त्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती विविध माध्यमांतून पोहोचवावी. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी होईल. प्रत्येक सेंटरसाठी अनुभवी कार्यक्रम प्रमुख नियुक्त करावा. कार्यक्रमासाठी मंडप किंवा सभागृह व्यवस्था, बैठक व्यवस्था, दृक्-श्राव्य व्यवस्था, इंटरनेटची सुविधा, स्क्रीनची उभारणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी व्यवस्था कराव्यात. वीजपुरवठा सुरळित राहण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सूचित केले. कार्यक्रमासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जागा निश्चित करणे, प्रशिक्षण केंद्र असलेल्या स्थळावर प्रक्षेपणासाठी ऑडिओ व्हिज्युअल साधनांची उपलब्धता करणे, मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था करणे आदींबाबतही त्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार बैठकीला उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

