सायकल फेरीतून दापोलीत दिवाळीतील किल्लेदर्शन

दापोली : येथील चिमुकल्यांसह तरुणांनी दिवाळीच्या निमित्ताने विविध किल्ले साकारले आहेत. ते पाहण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते पुढच्या पिढीलाही समजावे, आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा, यासाठी दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा निर्माण करण्यात आली आहे. दिवाळीमध्ये दगडमातीपासून किल्ले बनवण्याची मजा काही वेगळीच असते. दापोलीतही असे किल्ले साकारण्यात आले आहेत. ते पाहण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरी काढली. आझाद मैदानातून सुरू झालेली ही फेरी केळस्कर नाका- प्रभू आळी- झरी आळी- कोकंबा आळी- फॅमिली माळ- वडाचा कोंड- लालबाग- उदयनगर- आझाद मैदान अशा ९ किलोमीटरच्या मार्गावर फिरली. त्यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या फेरी मार्गावरील किल्ल्यांना भेट देऊन ते बनवणाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

सुराज्य मित्र मंडळाने साकारलेला भव्य सुवर्णदुर्ग, प्रभू आळी येथील भव्य राजगड, तोरणा, सुवर्णदुर्ग, शिंदे किरडावकर आंग्रे व मित्रमंडळींनी बनवलेले किल्ले, साहिल बामणे यांचा तोरणा, लालबाग येथील राळे, पाटील यांचा पुरंदर-वज्रगड पाहण्यासारखे आहेत. या मार्गावर इतर अनेक किल्ले सुंदर सजवलेले आहेत. सर्वांनी हे किल्ले बनवण्यासाठी वापरलेले साहित्य, सजावट इत्यादींबद्दल जाणून घेतले.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. किल्ले पाहण्यासाठी काढलेली सायकल फेरी हाही त्याचाच एक भाग होता. तिचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, सुधीर चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली.

दरम्यान, येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी दापोलीत चौथ्या विंटर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची नोंदणी लवकर करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सायकल फेरीची झलक पुढच्या व्हिडीओमध्ये –

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply