रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी गणेशगुळे येथील बारव स्वच्छता मोहीम राबवली.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिर कुर्धे (ता. रत्नागिरी) येथे सुरू आहे. याअंतर्गत स्वयंसेवकांना बारव अभ्यासक, कार्यकर्ते श्रीरंग मसुरकर यांनी माहिती दिली. एकविसाव्या शतकामध्ये नियोजनशून्य वापरामुळे पिण्यायोग्य पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. परंतु प्राचीन व मध्ययुगीन काळातील मानवाचे पाणी व्यवस्थापन अचंबित करणारे आहे. बारव हे त्याचेच एक महत्त्वाचे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.
जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून श्रमसंस्कार शिबिरात विविध उपक्रमांचे नियोजन केले जाते. त्यातील पाणीटंचाई ही फार गंभीर समस्या आहे. परंतु या समस्येवर आपल्या पूर्वजांनी योग्य नियोजनपूर्वक मात केल्याचे दिसून येते. यामध्ये बारव निर्मिती महत्त्वाची ठरते. भारतात जागोजागी पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पायर्यांच्या विहिरींची निर्मिती केल्याचे दिसते. यांना बारव (स्टेपवेल) म्हणतात. कोकणात अशा अनेक गावांमध्ये ब्रिटिश रेकॉर्डनुसार जवळपास १९ हजार बारवा आढळून येतात. त्यांची निर्मिती व्यापारी मार्ग, रस्ते, गावांमध्ये, शेतीच्या ठिकाणी केली गेली.
आताच्या काळात काही गावांमध्ये विजेच्या पंपामुळे वापराअभावी ग्रामस्थ व प्रशासनातर्फे क्वचितच या बारवांची काळजी घेतली जाते. अशाच ३०० वर्षे जुन्या कुर्धे आणि गणेशगुळे गावाजवळील बारवांच्या परिसराची स्वच्छता एनएसएस स्वयंसेवकांनी श्रमदानातून केली. स्वयंसेवकांनी बारव बांधकामावर उगवलेली झुडपे तोडली, तण काढले, इतर प्लास्टिक कचरा गोळा केला.
या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे ५२ स्वयंसेवक, श्रीरंग मसुरकर व कार्यक्रमाधिकारी प्रा. निनाद तेंडुलकर, प्रा. अभिजित भिडे, प्रा. अन्वी कोळंबेकर, प्रा. अनुष्का टिकेकर यांनी सहभाग घेतला.



