दापोली : येथे झालेल्या तिसऱ्या रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनात चिपळूण सायकलिंग क्लबचे मनोज भाटवडेकर यांना सायकल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी या कालावधीत पाच दिवसांचे तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज सभागृह येथे उत्साहात झाले. यामध्ये देश विदेशातील अनेक दिग्गज सायकलप्रेमी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. अनेकांना लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे मनोज भाटवडेकर यांना यावर्षीचा सायकल गौरव पुरस्कार देण्यात आला.
पाच दिवस या संमेलनात सादरीकरण सत्रे, मुलाखती, चर्चासत्र, अनुभव कथन, सायकल दिंडी, सायकल चित्रपट महोत्सव इत्यादी अनेक सायकलविषयक भरगच्च माहितीपूर्ण कार्यक्रम झाले. रशियातील अलेस्की बर्नोव्ह, लोहपुरुष डॉ. तेजानंद गणपत्ये, मिलिंद खानविलकर, रूपेश तेली-कुडाळ (डेक्कन क्लीफहँगर), संजय सावंत (नर्मदा परिक्रमा), यश म्हसकर (उमलिंगला पास), प्रेमसागर मेस्त्री-महाड, सुबोध गांगुर्डे (३६५ दिवस ३७० किल्ले), पूजा बुधवले (१२ ज्योतिर्लिंग यात्रा), डॉ रामेश्वर भगत, गोपाल साबे पाटील (जीआरएम), सागर बोडके नाशिक (अंधत्वावर मात), मुंबई परिसरातील धनंजय मदन, सायकल मेयर सुधीर चकोले, प्रज्ञा म्हात्रे (आम्ही सायकलप्रेमी), कुणाल सुतार, पूरनसिंह मेहरा, संजय खाडे, डॉ. सुनील पुणतांबेकर (डोंबिवली सायकल मित्र संमेलन), नीलेश कुष्टे इत्यादी अनेक नावाजलेले सायकलस्वारांचे अनुभवकथन, सादरीकरण सत्रे, प्रेरणादायी व विचार करायला लावणारी होती.
गेल्या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा संमेलनात सत्कार करण्यात आला. एलआरएम एसआर रॉकेटमॅन अहमदअली शेख, अमित कवितके, डॉ. मनीषा वाघमारे, प्रशांत दाभोळकर, रोहन पवार, श्रीनिवास गोखले, विनायक पावसकर, अथर्व शेंडे, ओमकार फडके, महेश सावंत, डॉ. अश्विनी गणपत्ये, इशान धनश्री गोखले, नभा श्रावणी, सिद्धेश बांदिवडेकर, प्रशांत पालवणकर, संजय मांजरे इत्यादी अनेकांना गौरवण्यात आले.
या सायकल संमेलनाचे नियोजन करण्यासाठी विनायक वैद्य, अंबरीश गुरव, सूरज शेठ, डॉ. संदेश जगदाळे, डॉ. रामदास महाजन, राजेंद्र नाचरे, शैलेश पेठे, प्रसाद देवस्थळी, धीरज पाटकर, अमित पेडणेकर आणि खेड, रत्नागिरी, चिपळूण, दापोली सायकलिंग क्लबच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. संमेलनात अनेक दिग्गज सायकलस्वारांची भेट, ओळख, मार्गदर्शन यामुळे सर्वजण खुश झाले. आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करून तंदुरुस्त आरोग्य जगण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

