Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

साने गुरुजी कथामालेचा आपुलकी पुरस्कार नवनाथ भोळे कुटुंबीयांना प्रदान

Advertisements

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचा मानाचा “आपुलकी कौटुंबिक पुरस्कार” पिंपरखेड (ता. जामखेड, जि. अहमदनगर) येथील प्राथमिक शिक्षक नवनाथ पांडुरंग भोळे आणि कुटुंबीय प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे वितरण जामडूल (ता. मालवण) येथील जामडूल रिसॉर्टमध्ये शिक्षणमंत्र्यांचे स्वीय सहायक रामचंद्र आंगणे आणि साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पूज्य साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त नवनाथ भोळे, सौ. स्वाती भोळे, कु. हर्षल भोळे, कु. स्वरा भोळे या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. प्रेम, सेवा, करुणा ही साने गुरुजींची त्रिसूत्रीच जीवनमूल्ये मानून नवनाथ भोळे कुटुंबीयांनी गेली १८ वर्षे मालवणच्या कथामालेसाठी योगदान केले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र गौरवग्रंथ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुगंधा गुरव, सदानंद कांबळी, पांडुरंग कोचरेकर, रामचंद्र कुबल, गुरुनाथ ताम्हणकर, सायली परब, रश्मी आंगणे, भानुदास तळगावकर, माधव गावकर, विजय चौकेकर आदी कथामाला कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री. ठाकूर म्हणाले, नवनाथ भोळे कुटुंबीयांनी कथामालेची सेवा हाच आपला “खरा तो एकची धर्म” मानला. कथामालेसोबत कोकण मराठी साहित्य परिषद व अन्य संस्थांची सेवा तेवढ्याच आपुलकीने केली. म्हणूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना रामचंद्र आंगणे म्हणाले, प्राथमिक शिक्षक नवनाथ भोळे यांची संभाजीनगरला झालेली बदली आणि अहमदनगर या गावी जाण्याचा सुवर्णयोग या दोन शुभ मुहूर्तांवर कथामालेचा पुरस्कार मिळणे हा खरोखरच त्यांच्यासाठी शुभयोग आहे. गेली १८ वर्षे त्यांनी कथामालेकडून घेतलेले संस्कार ते आपल्या भागात नक्कीच रुजवतील.

सत्काराला उत्तर देताना श्री. भोळे म्हणाले, माझ्या घरची शिकवण, पत्नी आणि कुटुंबाची साथ तसेच ठाकूर गुरुजी आणि अनेक कुटुंबीयांनी मला दिलेले प्रेम आणि करुणा यामुळेच ही सेवा माझ्या हातून घडली.

यावेळी कथामालेच्या २० कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांचा “आपुलकीचा माणूस – नवनाथ” हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला. त्याचे संपादन गुरुनाथ ताम्हणकर यांनी केले. सदानंद कांबळी यांच्या हस्ते हा ग्रंथ भोळे यांना प्रदान करण्यात आला. श्री. भोळे कुटुंबीयांच्या सन्मानार्थ आपुलकीची आनंदयात्रा हा सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला.

यावेळी त्रिंबक आजगावकर, सुरेंद्र सकपाळ, नारायण धुरी, वर्षाराणी अभ्यंकर, गुरुनाथ ताम्हणकर, चंद्रकांत माने या कथामाला कार्यकर्त्यांचा विशेष कामगिरीसाठी कथामाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, सुरेश गावकर, प्रकाश पेडणेकर, चंद्रशेखर हडप, लक्ष्मण आचरेकर, मनाली फाटक, संजय परब, कामिनी ढेकणे, प्रसन्ना ठाकूर, स्वराशा कासले, एकनाथ गायकवाड, महादेव बागडे, सूर्यकांत दळवी, रवींद्र मुणगेकर आदी कथामाला कार्यकर्त्यांसग मालवणच्या कथामाला कार्यकर्त्यांचा परिवार उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले, तर पांडुरंग कोचरेकर यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version