आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.
‘साने गुरुजींचे साहित्य म्हणजे प्रबोधनाचा गजर, माणुसकीचा जागर आणि कारुण्याचा आगर होय. साने गुरुजींच्या जीवनात करुणेला आणि अश्रूंना अनन्यसाधारण महत्त्व होते; पण ते अश्रू दुसर्यांच्या दुःखाने दुःखी होणाऱ्या आर्त मनाचे होते,’ हा विचार रामचंद्र कुबल यांनी सभागृहाच्या मनावर आपल्या अभिवाचनातून ठसविला. त्या अभिवाचनाने उपस्थित भारावून गेले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते रवींद्र मुणगेकर तथा वाघ काका होते. व्यासपीठावरच्या प्रमुख मान्यवरांत सुगंधा केदार गुरव (केंद्रप्रमुख, आचरे), स्मिता सदाशिव जोशी (मुख्याध्यापक, केंद्रशाळा आचरे), संजय भीमसेन आचरेकर (व्यवस्थापक, बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण), संजय रोगे (ग्रंथपाल, साने गुरुजी वाचन मंदिर मालवण), मनाली फाटक (महिला प्रमुख, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, आचरे) यांचा समावेश होता.
सर्व मान्यवरांनी साने गुरुजींबद्दल भाषणे केली. पांडुरंग गुरुदास कोचरेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि नियोजन केले. त्या वेळी प्रतिवर्षीप्रमाणे बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने पंचक्रोशीतल्या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधीचे वाटप करण्यात आले. सुरेश ठाकूर (अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला, मालवण) यांनी कथामाला आणि सेवांगण यांचे कार्य विशद केले.
या वेळी रामकृष्ण रेवडेकर, मृणालिनी आचरेकर, सायली परब, संजय जाधव, संतोष वरक, अमृता मांजरेकर, परशुराम गुरव, नवनाथ भोळे, संजय परब आदी कथामाला कार्यकर्ते, तसेच पंचक्रोशीतील पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. रावजी तावडे यांनी आभार मानले.
(कार्यक्रमाची एक झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत…)