चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसूत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने आखली आहे. त्यासाठी कलारसिक-साहित्यिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रत्येक कला आपल्याला अमूल्य ऊर्जा देत असते. कलाकाराला स्वतःच्या कलेखेरीज इतरही कलेविषयी आदरभाव असतो. यातून चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण होत असते. त्यासाठीच ही माहिती संकलित केली जाणार आहे. या प्रकल्पात लेखक, कवी, कादंबरीकार, कथाकार, चरित्रकार, गजलकार, समीक्षक, पत्रकार, चित्रकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, सादरकर्ते, प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, निरूपणकार, लोककलावंत, जलसाकार, गायक, वादक, संगीतकार, गीतकार तसेच ग्रामीण रंगभूमीवरील हौशी कलाकार आदींनी आपली माहिती देणे अपेक्षित आहे. आगामी काळात हा कोश डिजिटल आणि छापील स्वरूपात प्रसिद्ध करून सर्वांना सहज उपलब्ध करावा, सर्व कलाकारांची माहिती सर्वांना व्हावी, अशी ही योजना आहे.
या संदर्भ कोशातील माहिती पुण्यातील प्रकाशन विश्व या साहित्यिक कोशात नोंद करण्यासाठई उपयोगात आणली जाणार आहे. तसेच नागपूर शिक्षण मंडळाचे विभागीय सहसचिव श्रीराम चव्हाण तयार करत असलेल्या ‘मराठी साहित्यिकांचा कोश’ या महाराष्ट्र राज्य संदर्भ ग्रंथाच्या संकलनातही ही माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे. चव्हाण हे त्यांच्या संदर्भ ग्रंथामध्ये जन्मतारखेच्या अनुषंगाने शालेय उपक्रमासाठी हे संकलन करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांनी २५ जून २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही माहिती पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी एक गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. त्याची लिंक अशी –
https://forms.gle/17vc1Q98otn4qLL29
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड