पालघर : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेला अलीकडेच पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कै. वामनराव दाते उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पालघर येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय महिला साहित्य संमेलन झाले. त्या वेळी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ लेखिका मोनिका गजेंद्रगडकर, ‘कोमसाप’च्या अध्यक्षा नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या वतीने संस्थेचे आजीव क्रियाशील सदस्य आणि आचरे मतदारसंघाचे माजी जि. प. सदस्य ज्ञानदेव घनःश्याम पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यांच्यासोबत मंगेश मसके (अध्यक्ष, कोमसाप सिंधुदुर्ग), भरत गावडे (कोषाध्यक्ष, सिंधुदुर्ग), वृंदा कांबळी (महिला विभागप्रमुख, सिंधुदुर्ग) आदी सिंधुदुर्गातील कोमसाप पदाधिकारी उपस्थित होते.
पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर म्हणाले, ‘मानाचा समजला जाणारा हा कै. वामनराव दाते आदर्श शाखा पुरस्कार मालवणच्या सर्व 300 क्रियाशील सभासदांचा आहे. गेली चार वर्षं सर्वांनी तन, मन आणि धन खर्च करून विविध साहित्यिक उपक्रम राबवले आहेत. कोरोना कालावधीतही ऑनलाइन उपक्रमांचा मालवण शाखेने विक्रम केला. या प्रवासात रुजारिओ पिंटो, मंगेश मसके आदी अनेक पदाधिकारी व सहकाऱ्यांची साथ नेहमी लाभली.’
‘संस्थेचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक मालवण शाखेचे ज्या-ज्या वेळी कौतुक करतात, त्या-त्या वेळी तो आमच्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार असतो,’ अशी भावनाही सुरेश ठाकूर यांनी व्यक्त केली.
‘कोमसापच्या मालवण शाखेला लाभलेला हा मानाचा पुरस्कार मी ‘कोमसाप-मालवण’चे हितचिंतक आणि थोर गझलकार आदरणीय मधुसूदन नानिवडेकर यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करीत आहे,’ असेही ठाकूर यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड