आचरा (मालवण) : आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेतील अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उपक्रमाचा राष्ट्रीय अधिवेशनात गौरव करण्यात आला. अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला उपक्रमाचे ५५वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच अणदूर (तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील जवाहर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षणमहर्षी सि. ना. आतुरे गुरुजी नगरीत पार पडले. त्या वेळी आचरे उर्दू शाळेला गौरवण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते पन्नालाल खुराणा, कथामालेचे कार्यवाह सुधीर पुजारी, कथामालेचे कार्यध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी राज्यमंत्री मधुकरराव चौधरी आदी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आचरे येथील जि. प. उर्दू शाळेचे शिक्षक आफताब जहिरुद्दीन पटेल, सय्यद मुस्ताक सय्यद मुसा, मुख्याध्यापक निसार युनुस सोलकर आणि विद्यार्थी प्रमुख कु. मुहम्मद मुश्ताक सय्यद यांनी हा सन्मान स्वीकारला. रामचंद्र कुबल, दत्ताराम सावंत, समीर आचरेकर, रामकृष्ण रेवडेकर, रामचंद्र वालावलकर आदी कथामालेचे कार्यकर्तेही त्या वेळी उपस्थित होते.
‘जि. प. आचरे उर्दू शाळेतील कथामाला उपक्रम गेले अर्धशतक साने गुरुजी कथामालेचे प्रेरणादायी कार्य करीत आहे. त्या शाळेतील मुलांचे, पालकांचे, शिक्षकांचे कथामालेविषयी असलेले प्रेम आणि योगदान भारतातील कथामालेच्या सर्व उपक्रमांना प्रेरणादायी असेच आहे. साने गुरुजींना अपेक्षित असे कार्य या कथामालेने केले आहे,’ असे गौरवोद्गार अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे (मुंबई) अध्यक्ष श्यामराव कराळे यांनी या सत्कार समारंभात काढले.
‘कथामालेच्या मालवण शाखेच्या मार्गदर्शनाखाली आचऱ्यातील उर्दू माध्यमाच्या कथामालेने यशस्वीपणे पार केलेल्या सुवर्णमहोत्सवी कथामाला कार्याचा हा गौरव आहे,’ अशा शब्दांत अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी अभिनंदन केले.