कथामालेचा सेवामयी शिक्षक पुरस्कार रामचंद्र वालावलकर यांना प्रदान

माडखोल (सावंतवाडी) : ‘साने गुरुजी कथामाला हे गुरुजींच्या विचाराने मंतरून गेलेले एक झाड आहे. कथामालेचे व्रत शिक्षकांकडून एकदा स्वीकारले गेले, की विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम शिक्षकांच्या हातून उत्साहाने घडत जातात,’ असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी काढले. ‘साने गुरुजी कथामाला, मालवण’च्या सेवामयी शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माडखोल, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांना ‘अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मालवण’चा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार नुकताच माडखोल केंद्रशाळेत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, मानपत्र आणि रोख पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या वेळी कल्पना बोडके (गटशिक्षणाधिकारी, सावंतवाडी), विठ्ठल कदम (साहित्यिक), विजय राऊळ (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), श्रुती राऊळ (सरपंच, माडखोल), जी. जी. राऊळ (उपसरपंच, माडखोल) आदी मान्यवरांसह सुरेश गावकर, प्रकाश पेडणेकर, सुगंधा गुरव आणि मालवण कथामालेचे अध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या कल्पना बोडके यांचा सत्कार करण्यात आला.

कल्पना बोडके म्हणाल्या, ‘आज मालवण कथामालेच्या वतीने माझ्या सावंतवाडी गटातले केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांचा आपण जो सत्कार केलात, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. वालावलकर सरांकडून होत असलेलं ज्ञानदानाचं कार्य मी नेहमी पाहत आहे. त्यांनी माडखोलमध्ये सुरू केलेला कथामालेचा उपक्रम मी संपूर्ण तालुक्यात राबवण्याचा प्रयत्न करीन.’

या वेळी बोडके यांच्या हस्ते वालावलकर यांच्या पत्नी सौ. राजश्री वालावलकर यांचा कथामालेच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. वालावलकर यांच्याविषयी बोलताना बालसाहित्यकार विठ्ठल कदम म्हणाले, ‘वालावलकर यांनी तीन दशके कथामालेचे काम निरलस सेवावृत्तीने केले आहे. त्याग व सेवा यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रामचंद्र वालावलकर यांचे कथामाला कार्य होय.’

सत्काराला उत्तर देताना रामचंद्र वालावलकर म्हणाले, ‘माझ्या जीवनाची जडणघडण साने गुरुजी कथामालेच्या परिवाराने केली. आज त्याच परिवाराचा शिक्षणतज्ज्ञ कै.जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार मला मिळाल्याने मला जे समाधान लाभले, ते मी शब्दांत सांगू शकत नाही.’

या वेळी तिथे उपस्थित असलेले पूर्वीचे सेवामयी पुरस्कार विजेते परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, श्रुती गोगटे, हृदयनाथ गावडे, रश्मी आंगणे यांचा प्रकाश पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षणतज्ज्ञ कै. जी.टी. गावकर यांच्याविषयी सुरेश गावकर यांनी माहिती दिली. जी. टी. गावकर प्रतिमापूजन मोहनराव गावकर (कोल्हापूर) यांनी केले. या वेळी सदानंद कांबळी, नवनाथ भोळे, कामिनी ढेकणे, पांडुरंग कोचरेकर, सय्यद मुश्ताक, स्मिता जोशी, चंद्रशेखर हडप आदी कथामाला कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.

माडखोल केंद्रातून मुख्याध्यापिका विशुदा आजगावकर, ज्योती शिरोडकर, उमा तावडे, ऐश्वर्या पोकळे, दीपक पंडित, दत्ताराम सावंत, प्रवीण ठाकूर, अरुण म्हाडगूत, रश्मी सावंत, रोशन राऊळ, संजय बांबुळकर, सुरेश वालावलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वांचे स्वागत पांडुरंग कोचरेकर, सुगंधा गुरव यांनी केले, तर आभारप्रदर्शन महादेव बागडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले. मनाली फाटक यांनी म्हटलेल्या शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply