प्राथमिक शिक्षकांसाठी साहित्यनिर्मिती करणारे जी. टी. गावकर (सिंधुसाहित्यसरिता – ९)

जी. टी. गावकर (२३ नोव्हेंबर १९०५ – ३० जून १९९१)

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे सिंधुदुर्गातील नामवंत, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या साहित्यिकांचा परिचय करून देण्यासाठी सिंधुसाहित्यसरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यातील हा नववा लेख… जी. टी. गावकर यांच्याबद्दलचा… हा लेख लिहिला आहे सुगंधा गुरव यांनी…
………
या लेखातून मी अशा आगळ्यावेगळ्या साहित्यिकाची आपणास ओळख करून देणार आहे, की ज्याने आपल्या हाती लेखणी घेतली ती प्राथमिक शिक्षकांसाठीच! आज प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करणारे ‘जीवन शिक्षण’सारखे शैक्षणिक मासिक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत दर महिन्याला प्रकाशित केले जाते. प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ, मासिके आज उपलब्ध आहेत. शिक्षण पद्धती बदलली, तर बदलत्या शिक्षण पद्धतीवर लिहिलेले लेख अनेक नियतकालिकांतूनही वाचायला मिळतात; पण जवळजवळ ७५ वर्षांपूर्वी, गुजरातपासून कारवारपर्यंत आणि मुंबईपासून नागपूरपर्यंत पसरलेल्या मुंबई इलाख्यात प्राथमिक शिक्षकांना मार्गदर्शन करणारे आमचे दादाच होते. दादा अर्थात आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील पूजनीय जी. टी. गावकर. (गोविंद ठकोजी गावकर)

मी त्यांच्याच गावची एक प्राथमिक शिक्षिका असल्याने मला दादांचा आणि त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा अर्थातच अभिमान आहे. कारण पाऊण शतकापूर्वी ‘प्राथमिक परीक्षा’सारखे दर्जेदार मासिक सुरू करून मुंबई प्रांतातील शिक्षकांचे गुरू होते आमचे दादा.

त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १९०५ रोजी आचरे येथे झाला. ते सिंधुदुर्गवासीय असले, त्यांचा जन्म आचऱ्यासारख्या एका गावात झालेला असला, तरी ‘जीटीं’चे शैक्षणिक कार्य त्या काळी मुंबई इलाख्यात अगदी ठाणे, पुणे, मुंबईपासून दाहोद, बडोदा ते थेट कारवार, धारवाड, गोवा आणि अगदी विजापूरपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्या काळात जी. टी. गावकर यांनी जे ‘प्राथमिक परीक्षा’ नावाचे अभ्यासपूर्ण मासिक सुरू केले होते, त्याचे वर्गणीदार सर्वत्र पसरलेले होते. त्या दर्जेदार मासिकासोबत ‘जीटीं’ची कीर्तीही तिथपर्यंत पोहोचली होती. निरलस कार्याचा सुगंध दरवळला होता.

जी. टी. गावकर हे महाराष्ट्राचे शिक्षणतज्ज्ञ आणि थोर लेखक वि. द. घाटे यांचे समकालीन. वि. द. घाटे आणि जी. टी. गावकर या उभयतांनी सहलेखन केलेले ‘आपला इतिहास’ हे पुस्तक त्या वेळी क्रमिक पाठ्यपुस्तक म्हणून लागले होते. या शिवाय त्यावेळी त्यांची ‘नैसर्गिक भूगोल’ आणि ‘अंकगणित’ ही पुस्तके महाराष्ट्रात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत क्रमिक पुस्तके म्हणून लावण्यात आली होती. महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रात जी. टी. गावकर यांचे कार्य किती महत्त्वाचे होते, हे यावरून अधोरेखित होते.

त्या काळी मुलांना अवांतर वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘छान छान गोष्टी,’ ‘मला वाचता येते’ यांसारखी अनेक सुंदर सुंदर पुस्तके ‘जीटीं’नी प्रकाशित केली. त्यात ‘महात्मा’ या महात्मा गांधींच्या चरित्रावर आधारित चित्रमय पुस्तकाचा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या ‘अनुयायी’ या टोपणनावाने लिहिलेल्या दोन पुस्तकांचा खास उल्लेख करावा लागेल. त्याशिवाय त्यांनी मुलांसाठी रामायण व महाभारत यांवर आधारित छोट्या कथा लिहिल्या.

आज छपाई तंत्र अधिक सुलभ झाले आहे; पण ७० ते ७५ वर्षांपूर्वीचा काळ नजरेसमोर आणला तर ते काम किती कठीण होते हे आपल्या लक्षात येईल. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे!’ हा मूलमंत्र त्यांच्या लेखणीने प्रत्यक्षात आला. ठाणे जिल्ह्यातील बोर्डी ट्रेनिंग कॉलेजमध्ये अध्यापकपद, पुढे धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रॅक्टिसिंग स्कूलमध्ये अध्यापकपद व नंतर उपप्राचार्यपद त्यांनी भूषविले. त्यानंतर काही अपरिहार्य कारणांमुळे ठाणे जिल्ह्यात मोरवाड येथे बदली झाल्यामुळे द्यावा लागलेला राजीनामा आणि त्या सर्व मनःस्तापात आणि व्यापातही ‘जीटीं’नी आपली साहित्यसेवा सुरू ठेवली. त्यांच्या साहित्याच्या छपाईचे काम गिरगावच्या प्रफुल्ल प्रिंटिंग प्रेसमध्ये (जुना प्रसिद्ध यंदे यांचा इंदूभूषण छापखाना) चालायचे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी साहित्यसेवा, शिक्षणसेवा, समाजसेवा केली.

आयुष्याच्या अखेरीस ते आपल्या मूळ गावी, आचरे येथे आले. तेव्हाही त्यांच्यातील शिक्षक लोप पावलेला नव्हता. आपल्या गावच्या शेतीत विविध आधुनिक प्रयोग करणे, गावच्या शैक्षणिक व सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करणे, गीतेचा अभ्यास, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास हे राहिलेले छंद त्यांनी वृद्धापकाळात जपले. ३० जून १९९१ रोजी कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले. केवळ माझ्या गावासाठीच नाही, तर महाराष्ट्राच्या प्राथमिक शिक्षणासाठी नंदादीप ठरलेला हा दीप मावळला. त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची आमची मालवण शाखा गेल्या अनेक वर्षांपासून प्रति वर्षी सिंधुदुर्गातील उपक्रमशील शिक्षकांना ‘आदरणीय जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार’ देऊन त्यांची स्मृती चिरंजीव ठेवत आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्यास आणि पवित्र स्मृतींना माझे विनम्र अभिवादन!

 • सुगंधा केदार गुरव
  (केंद्रप्रमुख, केंद्रशाळा आचरे नं. १, मु. पो. आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)
  पत्ता : मु. पो. आचरे, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
  मोबाइल : ९४२०० ७८५१९
  ई-मेल : Skgurav07@gmail. com
  ………
  सिंधुसाहित्यसरिता या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.या उपक्रमाची संकल्पना ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांची आहे. अधिक माहितीसाठी, सूचनांसाठी, तसेच अभिप्रायासाठी त्यांच्याशी ९४२१२६३६६५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.)
  ……
  (‘कोमसाप’च्या मालवण शाखेतर्फे राबविल्या गेलेल्या ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply