मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे दिला जाणारा थोर शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षण पुरस्कार यंदा रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत. या पुरस्काराचे वितरण ९ जानेवारी २०२२ रोजी चाफेड भोगलेवाडी शाळेच्या प्रांगणात देवगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रजापती थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे. साने गुरुजी कथामाला कार्यकारिणीचे पदाधिकारीही या वेळी उपस्थित असतील.
संपूर्ण महाराष्ट्रात फार मानाचा मानला जाणारा हा पुरस्कार थोर शिक्षणतज्ज्ञ आदरणीय जी. टी. गावकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रदान करण्यात येतो. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दर वर्षी निवड समितीमार्फत शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक आदी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करून या पुरस्कारासाठी निवड केली जाते. त्यात शिक्षकांचे कथामालेचे कार्य आणि बहि:शाल शिक्षणाचे कार्य यांचे मूल्यमापन समितीमार्फत केले जाते. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख सदानंद मनोहर कांबळी यांनी नुकतीच याबाबतची अधिकृत घोषणा केली.
रश्मी रामचंद्र आंगणे यांनी गेली २५ वर्षे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सेवा बजावत असताना विविध शैक्षणिक उपक्रमांतून शाळा घराघरांत कशी जाईल आणि मुलांचे घर शाळेत कसे येईल, या दृष्टिकोनातून विविध शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळांत सेवा बजावत असताना वंचित घटकांसाठी त्यांनी कार्य केले आहे. तसेच शिष्यवृत्ती, क्रीडा, साहित्य, संस्कृती आदींबाबत बालकांना व पालकांना मार्गदर्शन केले आहे.
अ. भा. साने गुरुजी कथामाला मासिकाने त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना आपल्या मुखपृष्ठावर स्थान दिले आहे. अ. भा. साने गुरुजी कथामालेचे मालवण तालुकाध्यक्ष सुरेश श्यामराव ठाकूर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर यांच्या नावाचा पुरस्कार रश्मी रामचंद्र आंगणे ह्या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शिक्षिकेला मिळणे ही रश्मी आंगणे यांच्या एवढ्या वर्षांच्या निरलस शैक्षणिक सेवेची पोचपावती आहे.’
हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रश्मी रामचंद्र आंगणे यांचे समाजाच्या सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
(जी. टी. गावकर यांच्याबद्दल सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जी. टी. गावकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या २२ साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठीची लिंक त्याखाली दिली आहे.)
(सिंधुसाहित्यसरिता या छापील पुस्तकाची किंमत २०० रुपये आहे. पुस्तक घरपोच मागविण्यासाठी https://wa.me/919850880119 या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअॅपद्वारे ऑर्डर नोंदवू शकता. ई-बुक गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध असून, त्याची किंमत १५० रुपये आहे. ई-बुक खरेदीसाठी https://bit.ly/2IlFV7C या लिंकवर क्लिक करा.)
-
साप्ताहिक कोकण मीडिया – २५ फेब्रुवारी २०२२ चा अंक₹ 10.00
-
सिंधुसाहित्यसरिता₹ 200.00
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड