रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राजापूरमध्ये २४ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या २०२०मधील दोन पुरस्कारांचे राजापूरमध्ये रविवारी (२४ ऑक्टोबर) वितरण करण्यात येणार आहे. दुपारी ३.३० वाजता राजापूर हायस्कूलच्या कलामंदिरात हा कार्यक्रम होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरुण जोशी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना महामारी, टाळेबंदी व कार्यक्रमांवरील निर्बंधांमुळे हा कार्यक्रम गेल्या वर्षी करता आला नव्हता. आता या कार्यक्रमात राजापूरचे डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी पुरस्कार आणि सौ. अनघा विश्वास प्रभुदेसाई यांना आचार्य नारळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राजापूर ब्राह्मण सेवा संघाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे.

धन्वंतरी पुरस्कार डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना दिला जाणार आहे. त्यांनी सुरुवातीला पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्री डिग्री व इंटर सायन्स आणि टिळक आयुर्वेद कॉलेजमधून बीएएम अँड एस ही वैद्यकशास्त्राची पदवी संपादन केली. मातृमंदिर देवरुख आणि शिपोशी येथे वैद्यकीय व्यवसायाला सुरवात केली. १९७२ पासून ते राजापूर येथे व्यवसाय करत आहेत. राजापूर एसटी डेपो, एलआयसीचे अधिकृत वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक, राजापूर नगर वाचनालयाचे कार्याध्यक्ष, राजापूर संस्कृत पाठशालोत्तेजक निधी संस्थेत विश्‍वस्त, शिवस्मृती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून, यासह अशा विविध संस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कार ससाळे (राजापूर) येथील सौ. अनघा प्रभुदेसाई यांना दिला जाणार आहे. त्यांनी १९८६ पासून पाचेरी सडा (गुहागर), बारसू, आंगले, पांगरे बुद्रुक (राजापूर) या शाळांमध्ये ३४ वर्षे सेवा बजावली. गरजू विद्यार्थ्यांना मदतीसह शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, राजापूर ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण करंबेळकर आणि सचिव रघुवीर बापट यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply