स्वामी विवेकानंद केंद्र होण्यासाठी सर्वांचा हातभार हवा – राजेशिर्के

चिपळूण : स्वामी विवेकानंद यांच्यावर निस्सीम श्रद्धा असल्यानेच ओतारी आईच्या चित्रकलेत जिवंतपणा जाणवतो. एखादी कलाकृती साकारताना एकाग्रतेला महत्त्व आहे. अशी एकाग्रता आईंना स्वामींच्या ध्यान आणि योगसाधनेतून मिळाली आहे. चिपळुणात स्वामींचे केंद्र व्हावे हे ओतारी आईंनी बाळगलेले स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांनीच हातभार लावावा, असे मनोगत ज्येष्ठ चित्रकार प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्‍त केले.

स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ओतारी कुटुंबीयांकडून स्व. हेमलता ओतारी (आई) यांनी रेखाटलेल्या स्वामींच्या विविध भावमुद्रांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आज आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, स्वामी विवेकानंदांचे अभ्यासक मंदार ओक, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रमोद कोनकर यांनी मनोगतात सांगितले की, स्वत:मध्ये असलेल्या सामर्थ्याची जाणीव निर्माण झाल्यास व्यक्‍तीच्या हातून उल्लेखनीय कामगिरी होते. पासष्टाव्या वर्षी ओतारी आईंना त्यांच्यात असलेल्या सामर्थ्याची जाणीव योगशिक्षक अविनाश देवनाळकर यांनी करून दिली आणि तेथूनच स्वामींच्या भावमुद्रांचे रेखाटन करायला आईंनी सुरुवात केली. चित्र रेखाटताना अत्यंत एकाग्रतेने त्या काम करीत असत. ही एकाग्रता स्वामींवरील असलेल्या अपार निष्ठेसह ध्यानधारणा आणि योगाने त्यांना प्राप्त झाली होती. एकाग्रेतेने केलेल्या कामामुळे त्यांच्या कलेत सजीवपणा आला आहे.

मंदार ओक यांनी स्वामी विवेकानंदावर भाष्य करताना सांगितले, विवेकानंद ऐन तारुण्यात असताना त्यांना संन्यस्त अवस्थेत राहण्याची अजिबात इच्छा नव्हती. मात्र त्यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांच्या संपर्कात आल्यावर स्वामींचे जीवन बदलून गेले. केवळ वयाची ४० वर्षे आयुष्य लाभलेल्या स्वामींनी आपल्या उपदेशातून किंवा विचारधारेतून कधीही जात, धर्म, पंथ यावर भाष्य केले नाही. केवळ मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या विद्याभ्यास, योगातून उपदेश दिला. मी करून दाखवतो, यापेक्षा दुसऱ्याच्या व्यक्‍तीतील ताकद दाखवून देण्याचे काम स्वामींनी मार्गदर्शनपर उपदेशातून नेहमीच केले. स्वामींच्या उपदेशातून प्रत्येक व्यक्‍तीचे स्वत्व जागृत केले आहे. स्वामींनी प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेल्या ताकदीची ओळख उपदेश आणि विचारधारेतून व्यक्‍त करण्यास प्रोत्साहित केलेल्या स्वामींचे आयुष्य कमी असले तरी त्यांचे जीवनचरित्र समजावून घेण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागेल. विश्वव्यापी विश्वमानव असलेले स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेतून ओतारी कुटुंबीयांनी उराशी बाळगलेले स्वामींचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनीच हातभार लावून प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विवेकानंद केंद्र सुरू करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सेवा केंद्राविषय़ीची माहिती केंद्राच्या प्रमुख संगीता ओतारी यांनी दिली. या केंद्राला शक्य ती मदत करण्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी दिली. यावेळी डॉ. कुंदन ओतारी आणि अन्य मान्यवर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. पत्रकार शेखर धोंगडे यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply