रत्नागिरी : सह्याद्री रॅंडोनिअर्सतर्फे आयोजित २०० किलोमीटरची बीआरएम पूर्ण करून डॉ. तेजानंद गणपत्ये आणि संयम सोमण या रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोघांनी सुपर रॅंडोनिअर (एसआर) होण्याचा मान पटकावला आहे.
रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनाच्या निमित्ताने पहिल्या नाइट बीआरएमचे आयोजन करण्यात आले होते. बीआरएण (ब्रेव्हेट डी रँडोनीअर्स मॉँडिअॅक्स) म्हणजे २००, ४००, ६०० किलोमीटरच्या ठरावीक अंतराच्या सायकल राइड्स आहेत. त्या विशिष्ट वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायच्या असतात. रत्नागिरीतील पहिली बीआरएम उत्साहात पार पडली. सर्वांनी रात्रभर सायकल चालविण्याचा चांगला अनुभव घेतला. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सह्याद्री रॅंडोनीअर्सतर्फे विविध बीआरएम राइड्सचे आयोजन केले जात आहे. सायकलिंगमधील हे एक वेगळे क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यासाठी खुले झाले आहे. सायकलिंगकडे लोकांचा कल वाढत आहे. सह्याद्री रँडोनीअर्स क्लबच्यआ स्थापनेपूर्वी जिल्ह्यात ८ सुपर रॅंडोनिअर (एसआर) होते. आता क्लब स्थापन झाल्यानंतर अल्पावधीत ९ एसआर झाले असून लवकरच आणखी काही रायडर्स एसआर होण्याच्या मार्गावर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सायकलिंग क्लबचे बीआरएमसाठी सहकार्य मिळत आहे. यामुळे सायकलिंग क्षेत्रात आश्वासक चित्र उभे राहत आहे. रत्नागिरी हा सर्वाधिक एसआरचा जिल्हा होण्याचे स्वप्न आम्ही पाहिले आहे, अशी माहिती सह्याद्री रॅंडोनीअर्सचे मनोज भाटवडेकर आणि श्रीनिवास गोखले यांनी दिली.
नाइट बीआरएम २०० किमी आणि १०० किमीच्या या राइडमध्ये १४ रायडर्स सहभागी झाले होते. त्यापैकी २०० किमीसाठी रत्नागिरी, साखरपा, देवरूख, जयगडमार्गे रत्नागिरी असा मार्ग होता. खराब रस्ता, तापमानात अचानक झालेली घट, धुके यांचा सामना करत रायडर्सनी सायकलिंग करून यश मिळवले. रात्री झोपेवर नियंत्रण मिळवत बॅटरीच्या प्रकाशात सायकलिंग करणे आव्हानात्मक होते. कडाक्याची थंडी आणि रस्त्यांचे चढ-उतार यावरही रायडर्सनी मात केली. त्यातून दोन नवीन एसआर होत असतानाच चिपळूण सायकलिंग क्लबचे रोहन पवार, रत्नागिरी सायकलिंग क्लबचे अनुप मेहेंदळे, अमित पोटफोडे, महेश (बॉबी) सावंत, देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या पहिल्याच प्रयत्नात दोनशे किमी अंतर कापून बीआरएम पूर्ण केली.
पोहणे, धावणे आणि सायकल चालविणे अशा तिन्ही स्पर्धांमध्ये शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी ‘आयर्न मॅन’ ही जगभरात लौकिक मिळविलेली स्पर्धा आहे. डॉ. तेजानंद गणपत्ये चिपळूणमध्ये पॅथॉलॉजिस्ट असून त्यांनी यापूर्वी हाफ आयर्न मॅन अंतराची ट्रायथलॉन पूर्ण करण्याचा मान पटकावला आहे, तर चार वेळा हाफ मॅरेथॉन पूर्ण केली आहे. सायकलिंगमध्ये ३००, ४००, ६०० आणि आता २०० किमी राइड पूर्ण करून एसआर होण्याचा मान त्यांनी मिळवला. वैद्यकीय व्यावसायिक असूनही अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून आपल्या आरोग्यासाठी वेळ काढून सायकलिंग, पोहणे आणि धावणे यावर ते भर देतात. फुल आयर्न मॅनसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ट्रायथलॉन, डुएथलॅन या स्पर्धांमध्येही त्यांनी यापूर्वी घवघवीत यश मिळवले आहे. संयम सोमण हा चिपळूणच्या डीबीजे कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याने यापूर्वी ३००, ४०० आणि ६०० किमी राइड पूर्ण केली होती. यापूर्वी एसआर झालेल्या सायकलपटूंकडून त्याने टिप्स घेतल्या आणि यश मिळवले.



