Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे यश नारीशक्तीमुळेच – ॲड. दीपक पटवर्धन

Advertisements

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशस्वी अर्थकारणात महिलांचे योगदान लक्षणीय आहे. पतसंस्थेचे यश नारीशक्तीमुळेच आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, पतसंस्थेने महिलांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना संस्थेबरोबर संलग्न ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, योजना राबवल्या. त्या सर्व योजनांना सातत्याने प्रतिसाद प्राप्त होत राहिला. नारीशक्तीचा आर्थिक सहभाग हा अनमोल असा आहे. सर्वच क्षेत्रात नारीशक्ती अग्रेसर आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी शासनाने नारीशक्तीचे महत्त्व ओळखून नारीशक्तीचा सन्मान करत त्यांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबले. या धोरणाशी सुसंगत असे धोरण स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आरंभापासूनच अनुसरले आहे. पतसंस्थेची विश्वासार्हता, पारदर्शक व्यवहार, उत्तम ग्राहकसेवा यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचे व्यवहार सातत्याने विश्वासाने पतसंस्थेमध्ये होत असतात.

पतसंस्थेत नारीशक्तीच्या १५१ कोटी ४१ लाखांच्या ठेवी जमा आहेत. संस्थेतील महिला सभासदांची संख्या २१ हजार ४८१ आहे, महिला कर्जदार त्यातही लघुउद्योजक महिला कर्जदारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. पतसंस्थेच्या कर्जदार महिलांची संख्या ११ हजाराच्या आसपास आहे, ३०४ कोटींच्या ठेवींमध्ये महिलांचा वाटा १५१ कोटींचा आहे. पतसंस्थेच्या ४५ हजार सभासदांपैकी महिलांची संख्या २१ हजार आहे. ही आकडेवारी लक्षणीय आहे. महिलांच्या या सहकार चळवळीतील सक्रिय योगदानातून स्वरूपानंद पतसंस्थेला सातत्याने सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा प्राप्त होते, असे श्री. पटवर्धन म्हणाले.

‘महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्था समस्त नारीशक्तीचे अभिनंदन करते आणि नारीशक्तीला अभिवादन ही करत आहे, अशी प्रतिक्रिया ॲड. पटवर्धन यांनी दिली.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version