जनमानसावर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठसा

रत्नागिरी : गेल्या ३२ वर्षांमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेवरचा विश्वास तिसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यात मिळालेले यश खूप बोलके असल्याची भावना अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केल्या. पहिल्या पाच दिवसांत एकूण ठेवीदारांमध्ये महिलांचे प्रमाण ६२ टक्के आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या २० जून रोजी सुरू झालेल्या ठेववृद्धी मासाला प्रारंभीच मिळालेल्या प्रतिसादाच्या निमित्ताने ते बोलत होते. ते म्हणाले, गेली ३२ वर्षे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची प्रगती गाथा, नवनवीन उच्चांकी आकडेवारी, कार्यविस्तार आणि २० जून ते २० जुलै हा प्रतिवर्षी होणारा ठेवोत्सव यामुळे स्वरूपानंद पतसंस्था जनमानसात सातत्याने विराजमान राहिली. लुका कार्यक्षेत्र ते जिल्हा ते विभाग, विभाग ते राज्य कार्यक्षेत्र हाही विषय पतसंस्थेच्या यशशृंखलेची मजबूत पकड अधोरेखित करतो. एक छोटे कार्यालय ते विस्तृत प्रदेशात पसरलेल्या १७ शाखा ही बाब पतसंस्थेच्या यशाची चढती कमान दाखविणारी आहे.
स्वरूपानंद पतसंस्था स्थापन झाली त्यावेळी ३०० सभासद व १० हजारांचे भांडवल इतका अल्प असा आर्थिक आधार होता. आज ४३ हजार सभासद आणि ४०० कोटींचे संमिश्र असलेले खेळते भांडवल इतका विस्तृत आर्थिक आधार स्वरूपानंदने निर्माण केला. २६६ कोटींच्या ठेवी, १८९ कोटींची कर्जे, ३७ कोटींचा स्वनिधी, ९९.६० टक्के वसुली, १३३ कोटींच्या बँक गुंतवणुका अशी भक्कम स्थिती राखत भांडवल पर्यात्पता प्रमाण २७ टक्के तसेच शून्य टक्के N.P.A. व ६० टक्के C.D. रेशो अशी विक्रमी प्रमाणे राखणाऱ्या पतसंस्थेचे आर्थिक भक्कम आधारच आहेत. तोच ग्राहकांशी निर्माण केलेला ऋणानुबंध आहे.

एकतीस वर्षांपूर्वी ५० ते ६० वर्षांची असणारी पिढी ठेवीदार म्हणून स्वरूपानंदच्या संपर्कात आली. कालमानानुसार दुसरी पिढी ही स्वरूपानंदचे ग्राहक म्हणून कायम राहिली आणि आता ३० वर्षांनंतर डिजिटल युगातील युवा पिढी पूर्वसंस्कार, परंपरा मनात रुजवून स्वरूपानंद पतसंस्थेशी संलग्न झाली आहे. जो विश्वास ३१ वर्षांपूर्वी स्वरूपानंदने जागवला, तो दृढ होत एकतिसाव्या वर्षी तिसऱ्या पिढीकडे संक्रमित झाला. ठेववृद्धी मासातील ठेवीदारांची नावे पाहिली आणि बँक हिस्ट्री तपासली की स्वरूपानंद पतसंस्था ही कुटुंबाची पारंपरिक गुंतवणूक ठेवणारी अर्थसंस्था आहे याची प्रचीती येते. स्वरूपानंदच्या ठेववृद्धी मासात आपली ठेव गुंतवण्याचा २५ वर्षांपूर्वी सुरू झालेला परिपाठ अजूनही अविरतपणे सुरू आहे.

स्वरूपानंदच्या ठेववृद्धी मासात तिसऱ्या दिवशी पतसंस्थेने २ कोटी १० लाखाच्या नवीन ठेवी संकलित केल्या, याचे कारण नवीन ठेवीदार आणि पिढीज्यात ठेवीदार यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्राहक सभासदांना आपुलकी, प्रेम वाटावे, आपलेपणा वाटावा यासाठी डोळसपणे आणि अंतर्यामी प्रेरणेने राबवलेले धोरण खूप यशस्वी झाले आहे, ते यश स्वरूपानंदच्या सातत्यपूर्ण अर्थकारणातून प्रतीत होत आहे.
ठेववृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर ठेव संकलन होत आहे. हा विश्वास सदैव जपत पुढे जात प्रत्येक टप्यावर संस्थेशी जोडल्या जाणाऱ्या ग्राहक सभासदास आपलस करत, विश्वास जिंकत मार्गक्रमण करताना होणारा आनंद, समाधान लाख मोलाचे आहे. सुरू असलेल्या ठेववृद्धी मासात मोठी गुंतवणूक स्वरूपानंदकडे पाहायला मिळेल, असा विश्वास ॲड. पटवर्धन यांनी व्यक्त केला.

एकूण ठेवीदारांपैकी ६२ टक्के ठेवीदार महिला

पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासातील एकूण ठेवीदारांपैकी ६२ टक्के ठेवीदार महिला आहेत, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास सुरू होऊन २४ जून रोजी ५ दिवस पूर्ण झाले. या काळात एकूण २ कोटी ८६ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असल्याचे सांगून श्री. पटवर्धन म्हणाले, जाणीवपूर्वक सर्वसमावेशक धोरण अवलंबल्याने पतसंस्थेचा जनाधार वाढला आहे. समाजरचनेतील प्रत्येक वर्गातील सभासद, ग्राहक स्वरूपानंद पतसंस्थेबरोबर निगडीत आहे. केवळ विश्वासार्ह अर्थकारण करणे, उपयुक्त कर्ज आणि ठेव योजना राबवणे ही व्यावसायिक टॅगलाइन स्वरूपानंद पतसंस्थेने स्वीकारली आहे. समाजाच्या सर्व स्तरातील प्रदीर्घ काळ जोडलेले ग्राहक ही स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशाची गुरुकिल्ली म्हणावी लागेल. प्रत्येक ठेववृद्धी मासात मोठ्या संख्येने ग्राहक सभासद पतसंस्थेशी जोडले जातात. मोठ्या प्रमाणावर ठेव गुंतवणूक पतसंस्थेकडे होते. २६६ कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करत स्वरूपानंद पतसंस्थेला आता २७५ कोटींचा ठेव टप्पा खुणावत आहे.

श्री. पटवर्धन म्हणाले, सातत्याने जमा होणाऱ्या ठेवींमध्ये आतापर्यंत महिला ठेवीदारांचे प्रमाण ६२ टक्के आहे. महिलांना लक्ष्मीचे रूप मानले जाते. याच पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात महिला ठेवीदार स्वरूपानंद पतसंस्थेशी निगडित आहेत. उत्तम, विश्वासार्ह आर्थिक सेवा, आर्थिक शिस्त आणि कमालीची सुरक्षितता यामुळे स्वरूपानंद पतसंस्थेकडे महिला सातत्याने गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात. एक प्रकारे महिलांचे आर्थिक सबलीकरण होत असल्याचे द्योतक म्हणून महिला गुंतवणूकदारांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे जाणवते.

गेल्या २० जूनपासून सुरू झालेल्या ठेववृद्धी मासात महिलांसाठी अतिरिक्त व्याजाच्या योजना सुरू असून स्वरूपांजली ठेव योजना ८.२५ टक्के (१२ ते १८ महिने), सोहम ठेव योजना ८.५० टक्के (मासिक व्याज) (१९ ते ३६ महिने) स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने घोषित केल्या आहेत.
सर्वच गुंतवणूकदारांनी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन अध्यक्षांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply