बहुतेक शासकीय नोकऱ्यांमध्ये बदली अपरिहार्य असते. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक या बदलीच्या सत्राला नेहमीच तोंड देत असतात, पण मुळातच शिक्षकांच्या बदल्या कशासाठी केल्या जातात, हा प्रश्न आहे. अन्य खात्यांमध्ये कदाचित बदल्यांची कारणे वेगवेगळी असतील, पण नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या बंद करायला हव्यात. ज्या शाळेत एखाद्या शिक्षकाची नियुक्ती होईल, त्याच शाळेत त्याने नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत किंवा राजीनामा देईपर्यंत राहिले पाहिजे, असा नियम करायला हवा. तो झाला तर कोकणात जिल्हाबदलीमुळे निर्माण झालेले प्रश्न मुळातून संपुष्टात येतील.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या बदल्यांसाठी आर्थिक व्यवहार होत असतात. मुलांना सचोटी आणि नैतिकतेचे धडे देणारे शिक्षक स्वतःच्या बदलीच्या बाबतीत ती नैतिकता पूर्णपणे विसरतात. जिल्हा बदली हे तर फारच मोठे प्रकरण असते. कोकणातील बहुसंख्य शाळांमध्ये कोकणाबाहेरचे शिक्षक नोकरीसाठी रुजू होतात आणि ठरावीक काळानंतर ते आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करून निघून जातात. त्यामुळे कोकणातील शाळांमध्ये शिक्षकांचा तुटवडा जाणवतो. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी जिल्हा बदली करून घेतल्यामुळे जिल्ह्यातील १६१ शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही थोड्याफार फरकाने हीच स्थिती आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात नोकरी मिळत नाही. त्यामुळे ते कोकणातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रुजू होतात आणि सेवेत कायम झाल्याच्या दिवसापासूनच आपल्या जिल्ह्यात बदली करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. त्यासाठी होणाऱ्या अनैतिक आर्थिक व्यवहारांची सर्वांनाच माहिती असते. पण अचानक मोठ्या प्रमाणावर शिक्षक निघून गेल्यामुळे शाळा शून्यशिक्षकी झाल्या आहेत. अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये भरपूर सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मात्र शिकवायला शिक्षकच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खासगी शाळांकडे मुलांचा वाढलेला ओढा लक्षात घेतला तर जिल्हा परिषदेच्या शाळा का चालवायच्या हाही एक प्रश्न आहेच, पण शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याने सर्वांना शिक्षण देणे शासनालाही बंधनकारक असते. शिवाय ग्रामीण भागात अजूनही जिल्हा परिषदेच्या शाळांना पर्याय नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचे कामकाज चालते. पण केवळ नोकरीवर रुजू होण्यासाठी म्हणून कोकणाचा उपयोग करून घेऊन ठरावीक कालावधीनंतर आपल्या जिल्ह्यात बदली करून जाणाऱ्या अन्य जिल्ह्यांमधील शिक्षकांमुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या होत नाहीत. कारण ते एखाद्याच संस्थेत काम करू शकतात. विविध जिल्ह्यांमध्ये शाळा असलेल्या मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये बदली होत असली तरी बहुसंख्य शाळा स्थानिक संस्था चालवितात. त्यामध्ये शिक्षक कोणत्याही भागातून येऊन रुजू झाले, तरी त्यांना नोकरीच्या अखेरपर्यंत तेथेच थांबावे लागते. हीच पद्धत प्राथमिक शाळांच्या बाबतीतही अमलात आणायला हवी. नोकरीवर रुजू होतानाच ज्या शिक्षकाला एखादी शाळा दिली असेल, त्याच शाळेत त्याने अखेरपर्यंत राहायला हवे. प्राथमिक शिक्षकांची म्हणून जी काही जबाबदारी शासनाला आणि समाजालाही अभिप्रेत आहे, तीसुद्धा या पद्धतीमुळे शिक्षक पूर्ण करू शकतील. वर्षानुवर्षे शहरात किंवा शहरांच्या जवळपासच्या शाळांमध्ये ठाण मांडून राहणाऱ्या शिक्षकांमुळे होणारे आर्थिक व्यवहारही त्यामुळे थांबू शकतील. त्याचबरोबर त्या त्या शिक्षकांचे त्या त्या शाळेशी आणि गावाशी निर्माण झालेले संबंध शैक्षणिक कार्य पुढे न्यायला अत्यंत उपयुक्त ठरतील. यासाठीच प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या बदल्याच रद्द करायला हव्यात.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २३ जून २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – २३ जून २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia23june
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : हव्यात कशाला बदल्या?
https://kokanmedia.in/2023/06/23/skmeditorial23june/
मुखपृष्ठकथा : कोकणासाठी उपयुक्त सगुणा पद्धतीची शेती : कोकण विभागाच्या माहिती उपसंचालकांनी लिहिलेला लेख…
व्यवसायांचे बियाणे पेरणारी केबीबीएफची सिंधुदुर्ग मीट : बैठकीचा सविस्तर वृत्तांत
याव्यतिरिक्त, वाचक विचार, व्यंगचित्र आदी…
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


One comment