विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम शिक्षकांचे : प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी

रत्नागिरी : प्रत्येक विद्यार्थी हा हिराच असतो आणि त्याला पैलू पडण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी केले.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये वरिष्ठ महाविद्यालयातर्फे मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, सौ. पूजा मोहिते उपस्थित होत्या.

प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असल्याने आपल्या आयुष्यात तो सर्वांत महत्त्वाचा असल्याचे नमूद करतानाच एक दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थी कसा असला पाहिजे हे त्यांनी सविस्तर सांगितले. कॉलेजमध्ये तुम्ही हिरा असाल, तर तुम्हाला पैलू पाडले जातात आणि तुम्ही गारगोटी असाल तर तुम्हाला पॉलिश केले जाते. कठोर परिश्रम, नियमितपणा आणि प्रामाणिकपणा हे कोकणी विद्यार्थ्यांचे तीन महत्त्वाचे गुण आहेत. याबरोबरच व्यक्तशीरपणा तुमच्या अंगी असेल तर जगात कुठेही तुमचा निभाव लागेल, असेही त्यांनी सांगितले.

संस्थाध्यक्ष श्री. हेगशेट्ये म्हणाले, शारीरिक दुखण्यावर मात करत पुढे कसे जाता हे तुमच्या मानसिक पातळीवर अवलंबून असते आणि ती तुम्ही कशी तयार करता त्यावर तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती अवलंबून असते. त्याच जोरावर तुम्ही आयुष्यात जे पाहिजे ते मिळवू शकता. आज स्थलांतर हे कोकणासमोर मोठे आव्हान आहे, असे मला वाटते. स्वत:चा विकास पुणे, मुंबई किंवा परदेशात गेल्यावरच होतो असा समज आहे; मात्र आपल्या गावाचा, जिल्ह्याचा किंवा देशाचा उंबरठा ओलांडताना तो व्यापकही असायला हवा. आपल्याला पदवी मिळाली पण आपली क्षमता काय आहे हे प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत श्रमप्रतिष्ठेचा निकष बदलला आहे. प्रत्येकात असलेले कौशल्य वेगळे असून, ते स्वत:ला ओळखता यायला हवे आणि हे करतानाच आपल्या मातीपासून आपण लांब जाणार नाही याची काळजीही घ्यायला हवी.

यावेळी पल्लवी खेडेकर, तेजल सावंत, हीना अन्सारी, सादिया सारंग, झोया म्हसकर, मुस्कान मिरकर, ज्योती कक्केरकर, अक्षय राऊत, निहाल कोंडकरी, तेजस कुळकर्णी, कौशल चव्हाण, श्रावणी कांबळे, मंजिरी घवाळी, शिवानी उत्तेकर, सायली मालप, सेजल पंडेय, पौर्णिमा राजे, कोमल पाडावे, मैथिली सावंत, सायली चव्हाण, मनीष सावंत, रीना कांबळे, विद्या शिवगण या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका हुमेरा काद्री यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply