मालवण : प्रेमळ नातवंडे म्हणजे आजी-आजोबांची खरी जीवनकाठी आहे. त्यांच्या सान्निध्यात राहणे म्हणजे आपणही बालकांप्रमाणे स्वच्छंदी होणे, असे प्रतिपादन साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी केले.
आचरे (ता. मालवण) येथील फेस्कॉन संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या मासिक मेळाव्यात ते आजी आजोबा आणि कथाकथन या विषयावर बोलत होते. श्री. ठाकूर म्हणाले, प्रेमळ नातवंडे स्वतःची असू दे; शेजारची असू दे किंवा मानलेली असू द्या; कथाकथनाने त्यांच्या सान्निध्यात राहायला हवे. ज्येष्ठ वयात गोष्टी, गप्पा, गाणी यांच्या सान्निध्यातून जे ज्येष्ठ नागरिक ६ ते १४ या गटातील मुलांच्या संपर्कात राहतात, ते इतर ज्येष्ठ व्यक्तींच्या तुलनेत अधिक निरोगी, स्वच्छंदी आयुष्य जगतात. दि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचेही हेच मत आहे.
ज्येष्ठ व्यक्तींना कथाकथनाचे तंत्र आणि मंत्र समजावून देत असताना ठाकूर यांनी ६ ते १४ वयोगटातील मुलांना कथाकथन करण्यास योग्य कथांचे विविध प्रकार तसेच मुलांना कथाकथन करताना आजी-आजोबांनी कोणती कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गीतकथा, तालकथा, प्राणीकथा, नीतिकथा, बोधकथा, चातुर्यकथा, सृष्टीकथा, पर्यावरण कथा, धर्मकथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, संतकथा, पंतकथा, परिकथा, चरित्रकथा, विज्ञानकथा आदी अनेक कथांचे नमुने उदाहरणादाखल सादर केले. आजी-आजोबांनी कथाकथन करताना कथेची योग्य निवड, नातवंडांचा कथेत घ्यावयाचा सहभाग म्हातारपणातील आत्मविश्वास आणि अभिनय आदी कौशल्यांवर ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
व्याख्यानाचा समारोप करताना ते म्हणाले, ज्या आजी-आजोबांना मनोरंजक कथाकथन करता येत नाही, त्यांना स्वतःला आजी-आजोबा हे पद मिरवण्याचा अजिबात अधिकार नाही. वयपरत्वे देवांनी ज्येष्ठत्वाची दिलेले देणगी सर्व ज्येष्ठांनी सार्थकी लावावी आणि कथाकथनाच्या माध्यमातून नातवंडांचा प्रेमळ सहवास सदैव अनुभवावा.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अशोक कांबळी होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जकारीन फर्नांडिस यांनी केले, तर मनाली फाटक यांनी आभार मानले. यावेळी बाबाजी भिसळे, लक्ष्मण आचरेकर, प्रकाश पुजारे, सुरेश गावकर, भिकाजी रावजी कदम, सुप्रिया सकपाळ, सुरेंद्र सकपाळ आदींसह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

