कुडाळ : नाशिक येथील कळसूबाई मिलेट्स संस्थेच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून पारंपरिक भरडधान्य महत्त्व आणि संवर्धनाचा कार्यक्रम नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात पार पडला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी कळसूबाई मिलेट्सच्या संस्थापक श्रीमती नीलिमा जोरावर प्रमुख पाहुण्या आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी भरडधान्यांचे आहारातील महत्त्व आणि संवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांमधील पारंपरिक भरडधान्यांचा उपयोग शेतकरी आणि इतर सामान्य जनता यांना व्हावा यासाठी श्रीमती जोरावर गेली पंधरा वर्षे प्रचार आणि प्रसार होण्यासाठी निसर्ग संवाद, शिबिरे, मिलेट पारंपरिक अन्न महोत्सवाचे आयोजन महिला, शेतकरी यांच्यासाठी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नेरूरपार येथे कार्यक्रम पार पडला. रानभाज्या व भरडधान्याचे दैनंदिन आहारामध्ये असणारे महत्त्व, आरोग्यावर होणारे सकारात्मक बदल आणि त्यातून प्राप्त होणारी निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेती उत्पादनाच्या पारंपरिक आणि सुयोग्य पद्धती याविषयावर संवादही उपस्थित श्रोत्यांशी साधण्यात आला. भरडधान्य व पारंपरिक बियाण्याची माहिती देणारे एक प्रदर्शनही मांडण्यात आले होते.
यानिमित्ताने वसुंधरा संस्थेमार्फत नेरूर येथील रानभाज्या अभ्यासक रामचंद्र शृंगारे आणि पारंपरिक बियाणे संकलक सूर्यकांत कुंभार यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईतील वसुंधरा सल्लागार समितीचे अशोक राणे, कार्यवाह विश्वस्त सतीश नाईक आणि वसुंधराचे कार्यकर्ते उपस्थित होते. परिसरातील ५० हून अधिक शेतकरी आणि निसर्गप्रेमींनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

