लोकसभा निवडणूक २०२४ वृत्त
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी शकील सावंत या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक येत्या ७ मे रोजी होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना आज जारी झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस आहे. येत्या १९ एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून २० एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर २२ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. आज पहिल्या दिवशी रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक शकील सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. चिपळूणमधील अॅड. ओवेस पेचकर यांच्या उपस्थितीत त्यांनी हा अर्ज दाखल केला.
या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत यांची, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे काका जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या महायुतीतर्फे ही जागा कोणत्या पक्षाला द्यावी, याबाबतचा निर्णय अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे उमेदवाराचे नावही घोषित झालेले नाही. महायुतीमधील शिवसेनेने हा मतदारसंघ आपल्या हक्काचा असल्यामुळे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाच महायुतीतर्फे उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला आहे, तर भारतीय जनता पक्षातर्फे या मतदारसंघावर यावेळी दावा सांगण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. मात्र उमेदवारी अजून जाहीर झालेली नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे.
दरम्यान, रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्ती झालेले निवडणूक खर्च निरीक्षक अंकुर गोयल रत्नागिरीत दाखल झाले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मिन हे अधिकारी उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

