दापोली : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दापोलीच्या सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर सायकल वारी मोठ्या उत्साहात केली.
पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. या पंढरीच्या वारीची थोरवी सांगावी तितकी थोडी, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय सहभागी होतो. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थान आणि कर्नाटकातील गाणगापूर दत्त मंदिर देवस्थान दर्शनाला अनेकजण जातात. तेच औचित्य साधून दापोलीतील सायकलप्रेमींनी पुणे पंढरपूर मंगळवेढा सोलापूर अक्कलकोट गाणगापूर असे तीन दिवसात तब्बल ४५० किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली.
या सायकल वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, यश भुवड, समीर गोलम सहभागी झाले होते. सोबत मुंबईतील सतीश जाधव, शिवम खरात व बसवेश्वर पडेलकर यांनीही सायकल वारी पूर्ण केली. पहिल्या दिवशी पुणे ते पंढरपूर २४० किमीची सायकल वारी पुण्याच्या इंडो अॅथलेटिक सोसायटी सोबत केली. दुसऱ्या दिवशी पंढपूर मंगळवेढा सोलापूर अक्कलकोट असा १२५ किमीचा सायकल प्रवास झाला. तिसऱ्या दिवशी अक्कलकोट ते गाणगापूर असा ८५ किमीचा सायकल प्रवास झाला.
याबद्दल अधिक माहिती देताना दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये चालत सहभागी व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर या ४५० किमीच्या मार्गावर सायकल वारी केली. यासाठी आम्ही काही दिवसांपासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

