रत्नागिरी : विचारांना कृतीची जोड देणे म्हणजे गांधीवाद आहे, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. नीलेश पाटील यांनी केले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘महात्मा गांधीजींचे विचार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अहिंसा, सत्याग्रहाच्या तत्त्वावर कायम राहत गांधीजींनी राष्ट्रीय चळवळ आकाराला आणली. गांधीजींनी तळागाळातील लोकांचा विचार केला. वर्णभेद, रंगभेद यांचा विरोध केला. त्यांनी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा अंगीकार केला. श्रमप्रतिष्ठेचा आदर करून त्यात द्वेषाची भावना नसते, हे समजावून दिले. गांधीजींनी पोटतिडकीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. खेड्यांचे महत्त्व सांगताना गांधीजी म्हणत की, ग्रामराज्य ते रामराज्य हा प्रवास शक्य आहे. आरोग्याविषयी गांधीजी सजग होते. त्यांनी आयुर्वेदातील उपवासाचे महत्त्व जाणले होते. प्रा. पाटील यांनी गांधीजींचे विचार ओघवत्या शैलीत कथन केले. गांधीजी अर्थ विचारवंत, स्वच्छतेचे उपासक, सर्वधर्मसमभावाचे प्रणेते, राष्ट्रपिता होते, अशा अनेक गुणांचा परिचय त्यांनी करून दिला.
यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, कार्यक्रमाधिकारी प्रा निनाद तेंडुलकर, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. अभिजित भिडे, प्रा. स्नेहा बाणे उपस्थित होते. एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये एक तास स्वच्छता व श्रमदान केले.
अध्यक्षीय भाषणात पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर यांनी महाविद्यालय परिसरात केलेल्या श्रमदानाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व गांधीजींनी स्वावलंबन, स्वच्छता, स्वदेशी हे गुण आपल्या अंगी बाणवले व नंतर इतरांना उद्देश केला, असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक प्रा. अभिजित भिडे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय निशिता पवार हिने करून दिला. सूत्रसंचालन सेजल सावंत हिने केले. सायली कोतापकर हिने आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

