रत्नागिरी : परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीचे विसावे अधिवेशन येत्या १९ आणि २० ऑक्टोबरला पावस येथे होणार आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्रीस्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरात होणार असलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते होणार आहे. अधिवेशनामध्ये पप श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या साहित्यावर दोन्ही दिवशी सकाळी ९ ते ६ या वेळेत राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षापूर्वी स्वामीजींच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील समाधीस्थानी १९ आणि २० ऑक्टोबर २००२ रोजी श्री. नारायणकाका ढेकणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीची स्थापना झाली. स्वामीजींच्या संपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन, विविध भाषांमध्ये भाषांतर, स्वामीजींच्या संपूर्ण जीवनकार्याचा प्रसार ही प्रबोधिनीची मुख्य उद्दिष्टे आहेत.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (१८५४-१९१४) यांचा जन्म १८५४ साली सावंतवाडीजवळील माणगाव (ता. कुडाळ) गावी एका सत्प्रवृत्त कुटुंबात गणेश टेंबे आणि सौ. रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘वासुदेव’ होते. श्री द्विसहस्त्री गुरू चरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्तलीलामृताब्धीसार, योगरहस्य आणि बोधरहस्यावर द्विसाहस्री टीका – चूर्णिका, श्री दत्त पुराणावर टीका, माघ माहात्म्य, श्री दत्त माहात्म्य, श्री दत्त काव्यत्रिशती, श्री गुरुसंहिता (समश्लोकी), लघुवासुदेव मानससार, सप्तशती गुरुचरित्रसार, श्री कृष्णालहरी, श्री दत्तचंपू, कुमारशिक्षा, समश्लोकी चूर्णिका, श्री कृष्णालहरींवरील टीका, युवाशिक्षा, वृद्धशिक्षा, स्त्रीशिक्षा यासारखी फार मोठी ग्रंथ संपदा संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी निर्माण करुन ठेवली आहे.
त्यांच्या साहित्याची चर्चा होणार असलेल्या या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्याशी संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

