दापोलीत १० आणि १७ नोव्हेंबरला विंटर सायक्लोथॉन

दापोली : दापोली सायकलिंग क्लबतर्फे येत्या १० आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी दापोली विंटर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

सायकल चालवण्याचे अनेक फायदे असून सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने आयोजित केलेली ही सहावी स्पर्धा आहे. दोन्ही दिवशी दापोलीच्या सोहनी विद्यामंदिराच्या मैदानावरून स्पर्धा सुरू होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तसेच इतर राज्यांतून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत आले आहेत.

ही सायकल स्पर्धा १ ते ६५ किमी अंतराची असून १० नोव्हेंबर रोजी लांब अंतराच्या ३०, ४५ आणि ६५ किमी हॉर्नबिल सिनिक रुट मार्गावर होईल. या ६५ किमी सायक्लोथॉनचा मार्ग सोहनी विद्यामंदिर ते चंडिका देवी (दाभोळ), पंचनदी, गोमराई, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरूड, सालदुरे, आसूद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. ही स्पर्धा सकाळी पाच वाजता सुरू होईल. स्पर्धकांना ६ तासांत १००० मीटर चढउतार असणारे ६५ किमीचे अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल.

त्यानंतरची १७ नोव्हेंबरची स्पर्धा सकाळी सात वाजता दापोली शहरातील ४ किमीची शॉर्ट सिटी लूप राइड आणि विनामूल्य फन राइड असेल. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शिवाय काही खास बक्षिसेही असतील. मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.

स्पर्धेतील सहभागासाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणी अर्ज विनी इलेक्ट्रिकल (फॅमिली माळ), श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल (बाजारपेठ) या ठिकाणी मिळतील. अधिक माहितीसाठी ८६५५८७४४८६ किंवा ९०२८७४१५९५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. सर्वांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत सायकल चालवत यामध्ये सहभागी व्हावे आणि तंदुरुस्त जीवनशैली अनुभवावी, असे आवाहन दापोली सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply