आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा उपक्रम स्तुत्य – जिल्हा न्यायाधीश गोसावी

रत्नागिरी : कोकणी माणूस व नाटक यांचा जवळचा संबंध आहे. अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज आहे. विविध आजार आणि त्यावरील उपायांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी आरोग्य नाट्य स्पर्धा आयोजित केली हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी काढले.

विविध आजार व आजारांबद्दल समज व गैरसमज व त्यावरील उपाय याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आरोग्य जनजागृती नाट्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन न्या. गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी आरोग्य विभागासह पुढाकार घेऊन अशा पद्धतीने जनजागृती करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम आहे. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी हा स्तुत्य कार्यक्रम असून असे उपक्रम निरंतर व्हावे, असे सांगितले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ यांनी उद्दिष्ट व नियोजनबाबत प्रस्तावना केली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, आय. एम. अध्यक्ष डॉ. अतुल ढगे, डॉ. अलिमिया परकार आदी उपस्थित होते.

स्पर्धेकरिता डॉ. परकार, डॉ. ढगे, डॉ. विकास कुमरे परीक्षक म्हणून लाभले. विविध महाविद्यालये, जिल्हा शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा १६ संघांनी आरोग्य जनजागृतीवर आधारित उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेमध्ये भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला प्रमाणपत्र व रोख ८ हजार रुपये आणि सन्मान चषक प्रदान करण्यात आला. द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजला प्रमाणपत्र व रोख ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांक विजेत्या दैव, घैसास, कीर महाविद्यालयाला (पटवर्धन कॉलेज) प्रमाणपत्र व रोख ३ हजार रुपये आणि सन्मान चषक प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कांबळे यांनी केले. आभार प्रदर्शन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. शिरसाठ, सचिन पाटील, सतीश कांबळे, सचिन भरणे, रामेश्वर म्हेत्रे, राम चिंचोले आदीनी परिश्रम घेतले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply