आज २१ फेब्रुवारी. जागतिक राजभाषा दिन. याच अपूर्व मुहूर्तावर देशाची राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत असून कोकण प्रांतातील ग्रामीण साहित्य चळवळीला दिशा देणाऱ्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष, गुरुवर्य सुभाष लाड सर यांच्यासह मी त्यात सहभागी झालो आहे. अभिजात मराठी भाषेच्या या ऐतिहासिक महोत्सवाचा आनंद आम्ही पुढील तीन दिवस घेणार आहोत.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ।।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
माय मराठीच्या प्रांती आम्ही जन्म घेतला, हे आमचे सौभाग्यच जणू! मातृभाषा राजभाषा याच खरे म्हणजे राष्ट्राचे मानदंड असतात. भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांच्याबद्दल ज्यांना रास्त अभिमान वाटतो, त्यांच्यातच राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होत असतो. लोकभाषा हाच लोकशाहीचा कणा असतो. खरे तर आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा उशिराच मिळाला. कारण दिल्लीकडे डोळे वटारले की हव्या त्या सवलती मिळतात, हे तामिळनाडूला कळले ते आपल्याला अजूनही कळलेले नाही. दक्षिण भारतीय स्वतःचे, प्रांताचे प्राणतत्त्व जपून आहेत. पाच-सहा दशकांपूर्वीपासूनच ते विश्व तमिळ साहित्य संमेलने भरवतात. उत्तर भारतीयही विश्वहिंदी साहित्य संमेलन आयोजित करतात. आपण मात्र माय मराठीला राष्ट्रभाषा तर दूरच राजभाषा म्हणून मिरवण्यातदेखील खूप मागे पडलो.
असे असले, तरी सध्याच्या इंग्रजाळलेल्या काळातही राज्यात मराठीला पोषक वातावरण आहे, असे म्हणण्यास वाव आहे. सरकारने मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून नुकतेच पुणे येथे विश्व मराठी साहित्य संमेलन साजरे केले आणि आज जागतिक राजभाषा दिनी दिल्लीतील तालकटोरा मैदानात ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होते आहे, त्याचा निश्चितच आनंद वाटतो आहे. अपेक्षा इतकीच आहे की ही संमेलने फक्त दिखावू सोहळे न होता अभिजात मराठी भाषेच्या प्रसाराचे, चळवळीचे मुख्य केंद्र बनावीत, राज्यात सद्यःस्थितीत मराठी भाषेची होणारी गळचेपी थांबविण्याचा विचार तेथे व्हावा, बंद पडणाऱ्या मराठी शाळा पुन्हा एकदा सुरू करण्याची धोरणे यात तयार व्हावीत, विद्यापीठीय विविध ज्ञानशाखा मराठीतून सुरू व्हाव्यात व अभिजात मराठीला जागतिक भाषेचे स्थान मिळवून देण्यात या सोहळ्यांचा उपयोग व्हावा.
- विजय हटकर
दिल्ली डायरी
२१-२-२०२५

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

