रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध पब्लिक स्पीकिंग कोच आणि मोटिव्हेशनल स्पीकर प्रतीक कळंबटे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बिनधास्त बोलू’ ही संवाद, संभाषण आणि प्रभावी वक्तृत्वकलेविषयीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या चार दिवसांच्या कार्यशाळेचा समारोप पाच मार्च २०२५ रोजी सायंकाळी झाला. ‘आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आणि आम्ही आता कितीही लोकांसमोर बोलू शकतो…’ अशी प्रतिक्रिया या कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेत चार उद्योजक विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. स्टेजची भीती कशी घालवावी, स्वतःमध्ये आत्मविश्वास कसा निर्माण करावा, मुद्देसूद आणि प्रभावी भाषण कसे तयार करावे, आवाजात चढ-उतार कसा आणावा या संदर्भातील तांत्रिक आणि विस्तृत मार्गदर्शन प्रतीक कळंबटे यांनी केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व बाबींचा कसून सरावही करून घेण्यात आला. वैयक्तिक चुकाही सुधारून घेण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला. केवळ चार दिवसांत वेगवेगळ्या विषयांवर सुंदर आणि प्रभावी भाषणे त्यांनी सादर केली. आवाज म्युझिक इव्हेंट आणि ट्रेनिंगचे संचालक आणि सेलेब्रिटी अँकर किरण खोत यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थी आणि इतर उपस्थित श्रोत्यांना कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी लाभले. हा कार्यक्रम रत्नागिरीतील मंथन आर्ट स्कूलमध्ये पार पडला.
या कार्यशाळेत वायंगणकर हॉटेलचे मालक विनोद वायंगणकर, सोसा क्रिकेट अॅकॅडमीचे केतन सावंत, अनुश्री ऑटो केअरचे ज्ञानेश दाते आणि स्वामी समर्थ टायर्सचे प्रकाश भुरवणे हे विद्यार्थी म्हणून सहभागी झाले होते. त्यांनी स्त्री-पुरुष समानता, चांगला खेळाडू घडवताना, mho8 रेसिंग आणि आपल्या गाडीला जपताना अशा वेगवेगळ्या विषयांवर भाषणे केली. ती उपस्थितांना आवडली.
वक्तृत्वकलेत पारंगत होण्यासाठी सतत सराव गरजेचा आहे. यासाठी कोणतीही व्यवस्था किंवा प्लॅटफॉर्म सध्या उपलब्ध नाही. म्हणूनच ‘बिनधास्त बोलू’च्या वतीने ‘बिनधास्त बोलू क्लब’ ही एक अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे, असे पब्लिक स्पीकिंग कोच प्रतीक कळंबटे यांनी सांगितले. आपला आत्मविश्वास जागा करून आपल्या कर्तृत्वाला आणि संकल्पनांना वक्तृत्वाची जोड देण्यासाठी ‘बिनधास्त बोलू’ या कार्यशाळेत नक्कीच सहभागी व्हायला हवे, अशी भावना या कार्यशाळेत प्रशिक्षण घेतलेल्यांनी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी प्रतीक कळंबटे यांच्याशी 9665299329, 9130630260 (व्हॉट्सअॅप) या क्रमांकांवर संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




