खरवते ग्रामपंचायतीने प्लास्टिकमुक्तीवर लक्ष केंद्रित करावे – किरण सामंत

राजापूर : माझी वसुंधरा अभियानात चांगली कामगिरी बजावल्यानंतर आता खरवते ग्रामपंचायतीने संपूर्ण प्लास्टिकमुक्ती वर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी केले.

राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात भाग घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायतीच्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन आणि कोकण मीडियाच्या खरवते विशेषांकाचे प्रकाशन श्री. सामंत यांच्या हस्ते खरवते येथील गांगेश्वर विद्यालयात झाले. त्यावेळी ते बोलत होते. खरवते ग्रामपंचायतीने माजी वसुंधरा अभियानात राबविलेल्या विविध ८५ उपक्रमांचे श्री. सामंत यांनी कौतुक केले. खरवते गावात आढळलेल्या भुयाराचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांना पाठविले जाईल, असे सांगून श्री. सामंत म्हणाले, माझी वसुंधरा अभियानातील गुणांकनाकरिता जो कालावधी शिल्लक राहिला आहे, त्यामध्ये अभियानाकरिता आवश्यक असलेल्या सर्व त्रुटी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण सहकार्य ग्रामपंचायतीला केले जाईल. ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष द्यावे अशी सूचना श्री सामंत यांनी केली. अभियानामध्ये करवते ग्रामपंचायतीने जे उपक्रम राबविले आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. त्यामुळे जिल्हा आणि विभाग पातळीवरच नव्हे, तर राज्य पातळीवरही प्रथम येण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठेवावे, अशी अपेक्षा श्री. सामंत यांनी व्यक्त केली.

राजापूरचे गटविकास अधिकारी नीलेश जगताप यांनी खरवते गावातील लोकांच्या एकीमुळे अभियानाचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे, असे कौतुकोद्गार काढले. ग्रामसेवक, सरपंच आणि सदस्यांबरोबरच ग्रामस्थांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अशा अभियानात भाग घेतला तर निश्चितपणे यश मिळते, असेही ते म्हणाले.

कोकण मीडियाच्या खरवते विशेषांकाचे प्रकाशन

खरवते ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाची निर्मिती करणारे हर्षद तुळपुळे यांनी संकेतस्थळाविषयीची माहिती दिली. वेगवेगळ्या बारा विभागांमध्ये गावाची माहिती देण्यात आली आहे. यापुढेही ती सातत्याने अद्ययावत करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.

खरवते ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे प्रकाशन

ग्रामसेवक सौ. नेहा कुडाळी प्रास्ताविकात म्हणाल्या, अभियानातील सर्व ग्रामस्थांच्या सहभागामुळे अभियानाचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. अभियानात गावाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सौ. कुडाळी यांनी घेतला.

आमदार श्री. सामंत, सरपंच अभय चौगुले आणि उपसरपंच गौरव सोरप यांच्या हस्ते मान्यवरांचा तसेच विविध क्षेत्रांमध्ये यश मिळविणारे नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायतीचे पर्यावरणदूत आणि राजापूर पंचायत समितीचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर गुरसाळे गुरुजी यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले.

कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांनी विशेषांक प्रसिद्ध करण्याची भूमिका स्पष्ट केली. या अंकामुळे माझी वसुंधरा अभियान राबविताना ग्रामपंचायतीने योजलेल्या सर्व उपाययोजनांचे एक प्रकारे दस्तावेजीकरण झाले आहे. त्याचाही उपयोग ग्रामपंचायतीला गुणांकनासाठी होऊ शकेल, असेही ते म्हणाले.

मुखपृष्ठकथेच्या मथळ्याचे झाले घोषवाक्य
कोकण मीडियाने प्रसिद्ध केलेल्या खरवते गावाच्या विशेषांकाचा मुख्य मथळा खरवते गावाचा एकच घोष माझी वसुंधरा माझी वसुंधरा असा आहे. सूत्रसंचालक भास्कर गुरसाळे यांनी त्याचा समायोजित उपयोग केला आणि त्याच नावाचे घोषवाक्य उपस्थित सर्वांकडून प्रतिज्ञेसारखे म्हणून घेतले. वातावरण निर्मितीसाठी त्याचा चांगला उपयोग झाला.

खरवते ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा.

कोकण मीडियाचा २८ मार्च २०२५ रोजीच्या अंकाची झलक पुढील लिंकवर वाचता येईल.

डेलीहंट – https://dhpr.in/ZAwHl

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply