Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

जमिनीची फेरफार नोंद करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच; मंडणगडमध्ये अधिकारी जाळ्यात

Advertisements

मंडणगड : रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंडणगडमध्ये केलेल्या कारवाईत दोन लाचखोर अधिकारी आणि एका शिपायाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आलं असून, त्याआधी त्यांनी ४५ हजार रुपयांची लाच ऑनलाइन स्वीकारली होती. २७ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातल्या म्हाप्रळचे मंडळ अधिकारी अमित शिगवण, ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) श्रीनिवास श्रीरामे आणि मंडणगडच्या उपकोषागार कार्यालयातील शिपाई मारुती भोसले या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराने शेणाळे गावात लिलावामध्ये पत्नीच्या नावे शेतजमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीची फेरफार नोंद करून तसा सातबारा उतारा करून देण्यासाठी शिपाई मारुती भोसले यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने ४५ हजार रुपये भोसले यांना ऑनलाइन पाठवले; मात्र पूर्ण रक्कम न मिळाल्याने मंडळ अधिकारी अमित शिगवण यांनी ती नोंद रद्द केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ते प्रलंबित काम पूर्ण करून देण्यासाठी तक्रारदाराने २७ मे रोजी त्या तिघांची भेट घेतली. त्या वेळी शिगवण यांनी तीस हजार रुपयांची लाच स्वीकारली. आपला वाटा बाजूला ठेवून त्यांनी त्यातले १४ हजार ५०० रुपये तलाठी श्रीनिवास श्रीरामे यांना दिले. तेव्हाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना पंचांसमक्ष ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी ही माहिती दिली. नागरिकांनी कोणत्याही कामासाठी लाच देऊ नये आणि लाचेची मागणी झाल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. संपर्कासाठीचा तपशील खाली दिला आहे.

टोल फ्री क्रमांक १०६४
फोन : (०२३५२) २२२८९३
मोबाइल : ७५८८९४१२४७, ९८७०४७४५३५
ई-मेल : acbratnagiri@gmail.com

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version