cutout paper composition demonstrating money turnover on purple background

अभिनंदनीय कामगिरी

खेड तालुक्यातील एका शासकीय कर्मचाऱ्याने त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याने अभिनंदनीय कामगिरी केली आहे. लाच घेण्यासाठी विविध शासकीय खाती, त्यातही महसूल आणि पोलीस खाते तसे बदनाम असते. अपवाद वगळता त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत नाहीत. ‘चिरीमिरी’ हा लाच देण्यासाठी वापरला जाणारा शब्द सर्वाधिक पोलीस खात्यासाठीच वापरला जातो. या पार्श्वभूमीवर खेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या लोटे या दूरक्षेत्रात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाळू कदम यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. त्याचबरोबर पोलीस खात्याला आणि सर्वसामान्य नागरिकांनाही एक चांगला संदेश दिला आहे.

चिपळूण तालुक्‍यातील एका लाकूड व्यावसायिकाचा लाकडांची अवैध रीतीने वाहतूक करणारा ट्रक वन विभागाने जप्त केला आणि तो लोटे पोलीस दूरक्षेत्राच्या देखरेखीखाली ठेवला. वन खात्याने आकारलेला दंड त्या व्यावसायिकाने भरला, मात्र त्याच्याविरुद्धची कारवाई पूर्ण झाली नव्हती. अवैध वाहतुकीच्या लाकूडसामानासह तो ट्रक पुढच्या कारवाईसाठी वन विभागाच्या ताब्यात जाणार होता. वन विभाग त्यावर पुढची कारवाईची प्रक्रिया करणार होते. मात्र त्यापूर्वी तो ट्रक आणि त्यातील लाकूड आपल्या ताब्यात मिळावे, यासाठी त्या अवैध वाहतूक करणार्‍या लाकूड व्यावसायिकाने श्री. कदम यांना पाच हजाराची लाच देण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा तसा प्रयत्न करूनही श्री. कदम बधले नाहीत, पण तरीही त्या व्यावसायिकाने लाच देण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर श्री. कदम यांनी त्याला लाचलुचपत खात्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्या खात्याने सापळा रचून त्या व्यावसायिकाला ताब्यात घेतले. ही तशी लाचलुचपत खात्याच्या दृष्टीने सर्वसामान्य घटना आहे. कारण अनेक नागरिक तशी तक्रार करतात आणि अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागते. पण या ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्याने एका खासगी नागरिकाविरुद्ध लाच देण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. हे वेगळे उदाहरण आहे.

लाच देणे आणि लाच घेणे या दोन्ही गोष्टी म्हणजे गुन्हाच आहेत, असे सांगितले गेले आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला लाच देऊन आपले काम करून घ्यावेसे वाटते. लाच देण्यात त्याला तसे काहीच वाटत नाही. शासकीय अधिकारी आणि कर्मचारीही याच गोष्टीचा फायदा घेतात आणि लाच देण्या-घेण्याच्या गुन्ह्याचे घोषवाक्य केवळ भिंतीवर लटकत राहते. या ठिकाणी एका पोलिसाने सामान्य माणसाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. योग्य आणि व्यवस्थित वागायचे झाले तर शासकीय कर्मचारीही कायद्यानुसार वागू शकतो, याचे हे मोठे उदाहरण आहे. आधी उल्लेख केल्याप्रमाणे ‘चिरीमिरी’ हा शब्दप्रयोग रस्त्यावरचे ट्रॅफिक पोलीस, हवालदार, तलाठी, मंडल अधिकाऱ्यांपासून ते महसूल तसेच इतर शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या बाबतीत वापरला जातो. त्यामुळे श्री. कदम यांनी ठरल्यानुसार पाच हजारापैकी तीन हजार रुपयांची लाच घेतली असती, तर ते कुणाला कळलेही नसते. त्या व्यावसायिकाचा ट्रक सुटला असता. तो पुन्हा अवैध वाहतूक करायला मोकळा झाला असता. त्याला प्रतिबंध करायचे काम दत्तात्रय कदम यांनी केले आहे. म्हणूनच श्री. कदम अभिनंदनाला पात्र आहेत. श्री. कदम यांचे हे उदाहरण विरळा असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यापासून बोध घ्यायलाच हवा. पण सर्वसामान्य माणसांनी तरी या घटनेपासून बोध घेतला पाहिजे. लाच घ्यायला आपणच शासकीय कर्मचाऱ्यांना प्रवृत्त करत असतो. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ४ मार्च २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply