पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली पृथ्वीवरील बदलांची माहिती

रत्नागिरी : पुण्यातील असीमित आणि अनुनाद फाऊंडेशन आयोजित ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह-माझे घर’ या विषयावरील अनोख्या प्रदर्शनाला आजपासून गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या बाबूराव जोशी ग्रंथालयात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने हे प्रदर्शन प्रथमच रत्नागिरीत भरवण्यात आले आहे. पृथ्वीची भौगोलिक रचना आणि जैवविविधता यांचे चित्रांद्वारे आणि माहिती दिली जात आहे. दिवसभरात सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट देऊन प्रदर्शन पाहिले. या प्रदर्शनासाठी सहआयोजक गोगटे- ोगळेकर महाविद्यालय, निसर्गयात्री संस्था आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे सहकार्य लाभत आहे. विज्ञान आणि पर्यावरण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती व्हावी, पृथ्वी आणि तिचे विश्वातील महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी कुंडीतील झाडाला पाणी घालून केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. आनंद आंबेकर, असीमितचे सारंग ओक, अनुनादच्या पूजा खांडेकर, निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूरदेसाई आणि लायन्स क्लबचे गणेश धुरी, अभिजित गोडबोले आदी उपस्थित होते.

प्लास्टिकबाबत जागृती होण्याकरिता प्रदर्शनाचे शुल्क म्हणून रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या आणण्याचे आवाहन केले होते. सुमारे एक हजार रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. एखाद्या विद्यार्थ्याला प्लास्टिक बाटल्या मिळाल्या नाहीत तरीही त्याने प्रदर्शनाला आवर्जून यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे प्रदर्शन उद्या दि. ५ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. पाचवीच्या पुढील इयत्तांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रवेशशुल्क म्हणून प्लास्टिक बाटल्या संकलित करण्यात आल्या.

प्रदर्शन पाहताना विद्यार्थी.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply