रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आज सायंकाळी जाहीर प्रचार संपला, पण या प्रचाराच्या काळात कोकणातील वानर-माकडांच्या उपद्रवाचा महत्त्वाचा प्रश्न एकाही उमेदवाराने प्रचारसभेत मांडलेला नाही.
वानर-माकडांचा उपद्रव थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गोळप (ता. रत्नागिरी) येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अविनाश काळे यांनी याबाबत नाराजी आणि संतापही व्यक्त केला. ते म्हणाले, गेली सुमारे दोन वर्षे वानर-माकडांच्या शेतीला होणाऱ्या प्रचंड उपद्रवाबाबत मी आणि शेकडो शेतकरी आंदोलन करत आहोत. तात्पुरता उपाय म्हणून वानर-माकड पकडुन अभयारण्यात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कायमचा बंदोबस्त हवा असेल तर संसदेत हिमाचल प्रदेशच्या धर्तीवर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वानर-माकडांना उपद्रवी पशू घोषित करणे गरजेचे आहे.
या समस्येबाबत राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांपर्यंत ही समस्या पोहोचवली का, की ही समस्या त्यांना वाटत नाही? एकाही उमेदवाराने रत्नागिरी सिंधुदुर्गातील वानर-माकड उपद्रव या गंभीर समस्येची दखल घेतलेली दिसली नाही. कोणत्याही प्रचारसभेत या प्रश्नाबाबत भाष्य केलेले नाही, असेही ते म्हणाले.
सगळ्या उमेदवारांना मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी किती काळजी आणि मतदारसंघातील प्रश्नांची किती जाण आहे, हे यातून स्पष्ट झाले आहे, असे सांगून श्री. काळे म्हणाले, राजकीय कार्यकर्ते आपल्या उमेदवारांपर्यंत मतदारसंघातील सगळे प्रश्न पोहोचवत नाहीत, असा याचा अर्थ होतो. विषय लक्षात आहे, प्रश्न मांडून सोडविण्याचे नियोजन सुरू आहे, फक्त उल्लेख करायचा राहिला आहे, असे समजायचे का? हा प्रश्न उमेदवारांनी आता लक्षात घेतला नाही, तर नंतर प्रश्न मांडायला आम्हाला दिल्लीत जावे लागण्याची शक्यता आहे, असेही ॲड. काळे (९४२२३७२२१२) म्हणाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

