सुंदर पत्र लिहा, ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळवा

शालेय विद्यार्थ्यांसाठी टपाल विभागाची पत्रलेखन स्पर्धा

रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हवामानातील संकटावर का आणि कशा प्रकारे उपाययोजना करता येईल, या संदर्भात एका प्रभावशाली व्यक्तीस पत्र लिहावयाचे आहे. उत्तम पत्रांकरिता ५० हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्या पहिल्या तीन क्रमांकांना राष्ट्रीय स्तरावर अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १० हजार रुपये व प्रमाणपत्र दिले जाईल. सर्कल स्तरावर पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे २५ हजार, १० हजार आणि ५ हजार रुपये व प्रमाणपत्र अशी बक्षिसे दिली जातील.

स्पर्धकाने केलेले लिखाण पत्राच्या स्वरूपात असले पाहिजे. वय वर्षे ९ ते १५ या वयोगटातील मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. भाषा- मराठी, इंग्रजी, हिन्दी. लिहिण्यात येणारा संदेश पत्राच्या स्वरूपात असावा. शब्दसंख्या ८०० पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे. अर्ज पाठविण्यची अंतिम तारीख ११ मार्च २०२२ पर्यंत ही आहे. स्पर्धा रविवार, २० मार्च सकाळी ११ ते १२ या वेळेत होईल. स्पर्धेच्या ठिकाण प्रत्येक शाळेला कळविण्यात येईल. सध्या चालू असलेल्या करोनाच्या संकटामुळे ज्या स्पर्धकांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, परंतु स्पर्धेकरिता निवडल्या जाणाऱ्या ठिकाणी स्वत: उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांना यावर्षी घरूनच सहभागी होण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अशा सर्व स्पर्धकांनी दिलेल्या पत्त्यावर त्यांच्या प्रवेशिका स्पीड पोस्टद्वारे १५ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा प्रकारे पाठवाव्यात. प्रवेशिकेबरोबर विहित नमुन्यातील अर्ज, वय प्रमाणित करण्याकरिता जन्मदाखला व आधार कार्ड किंवा शाळेचे प्रमाणपत्र तसेच पासपोर्ट आकाराचे ३ फोटो जोडावेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी पत्ता असा – डायरेक्टर, जीपीओ, मुंबई, पहिला मजला, जीपीओ, मंबई ४००००१.

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक आ. ब. कोड्डा यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply