रत्नागिरी : कोल्ड्रिफ कफ सिरपच्या बॅच नं. SR-13मध्ये विषारी पदार्थ आढळल्यामुळे त्याचा वापर नागरिकांनी तात्काळ थांबवावा. हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या जवळच्या कार्यालयाला त्वरित कळवावे किंवा acfdartn2019@gmail.com यावर ई-मेलकरून थेट अन्न व औषध प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे) शशिकांत यादव यांनी केले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये कफ सिरप औषधाच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे. Coldrif Syrup (Batch No. SR- 13) Mfg. Dt. May- 2025, Exp. Dt. April 2027, Manufactured by Sresan Pharma, Sunguvarchathiram, Kancheepuram District, Tamil Nadu अशी या सदोष औषधाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. त्या औषधात डायथिलीन ग्लायकोल (Diethylene Glycol DEG) हा विषारी घटक मिसळलेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी तत्काळ या औषधाचा वापर थांबवावा. हे औषध कोणाकडे उपलब्ध असेल, तर ते अन्न व औषध प्रशासनाच्या जवळच्या कार्यालयाला त्वरित कळवावे किंवा ई-मेलद्वारे माहिती द्यावी.
या औषधाच्या राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई करण्याकरिता राज्याच्या अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी तमिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहेत. राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालये यांना या औषधाच्या समूह क्रमांकाचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो सर्व साठा गोठवावा, अशा सूचना सर्व औषध निरीक्षक व सहायक आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासन याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे. जनतेने सावधानता बाळगावी आणि धोका टाळावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

