मधुमेहामुळे मेंदूपासून पायांपर्यंत सर्व अवयवांवर होतात दुष्परिणाम!

जागतिक मधुमेहदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशिष सरवटे यांची विशेष साप्ताहिक लेखमाला कोकण मीडियाने सुरू केली आहे. त्या लेखमालेचा हा दुसरा भाग…
मधुमेह अर्थात डायबेटीसच्या समस्येची भारत आणि जगातील तीव्रता, मधुमेहाची लक्षणे आणि मधुमेहाचे निदान करणाऱ्या चाचणीचे प्रकार याबद्दलची माहिती आपण या लेखमालेच्या पहिल्या भागात घेतली. आजच्या या दुसऱ्या भागात आपण आणखी काही माहिती घेऊ या.

मधुमेह कोणाला होऊ शकतो?

  • आनुवंशिकता : ज्यांच्या आधीच्या पिढीत कोणाला मधुमेह असेल, त्यांना मधुमेह असण्याची शक्यता असते.
  • ४५ वर्षांपुढील व्यक्ती : या वयोगटातील व्यक्तींना मधुमेह होऊ शकतो.
  • उच्च रक्तदाब असलेल्यांना मधुमेह होऊ शकतो.
  • काही वेळा स्त्रियांना गर्भवती असताना मधुमेहाचे निदान होऊ शकते.
  • बैठी कार्यपद्धती : ज्या व्यक्तींना कित्येक तास एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते, त्यांना मधुमेह होऊ शकतो.
  • लठ्ठपणा : लठ्ठ व्यक्तींनाही मधुमेह होऊ शकतो.
  • Pre-Diabetic : म्हणजे ज्यांच्या रक्तातील साखरेची पातळी निरोगी व्यक्तीच्या तुलनेत अधिक असते त्यांनाही योग्य काळजी न घेतल्यास मधुमेह होऊ शकतो. प्री-डायबेटिक कोणाला म्हणायचे, याची माहिती लेखमालेच्या पहिल्या भागात दिली आहे.

मधुमेहाचे प्रकार

  • टाइप वन : हा प्रकार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो. त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावे लागते.
  • टाइप टू : प्रौढ वयातील व्यक्तींना होणारा हा मधुमेहाचा प्रकार आहे. हा शक्यतो गोळ्यांच्या साह्याने नियंत्रणात येतो.
  • टाइप थ्री : गरोदरपणात उद्भवणारा असा हा मधुमेहाचा प्रकार असतो. तो प्रसूतीनंतर जातो; पण अशा स्त्रियांना पुढील आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.
  • टाइप फोर : काही वेळा स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे स्वादुपिंड (Pancreas) काढावे लागले, तर अशा व्यक्तींनाही मधुमेह होतो.
  • टाइप फाइव्ह : काही व्यक्तींचे स्वादुपिंड कुपोषित असल्याने इन्सुलिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्तातील साखर खूप वाढते.

मधुमेहामुळे होणारे विकार : (Complications)
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने आणि दीर्घ काळ मधुमेह असल्याने शरीरावर घातक परिणाम होतात. मधुमेही व्यक्तींच्या मेंदूपासून पायांपर्यंत सर्व अवयवांवर दुष्परिणाम होतात.

  • मेंदू : मधुमेही व्यक्तींना लकवा होण्याचे प्रमाण दुप्पट असते.
  • डोळे : मधुमेहामुळे रेटिनोपथीमुळे डोळ्यांत रक्तस्राव होऊन अंधत्व येते.
  • हृदय : मधुमेहींमध्ये उच्च रक्तदाब व हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण जास्त असते. काही मधुमेही रुग्णांना हार्ट अ‍ॅटॅक आल्याचे कळतही नाही. (Silent Heart Attack)
  • फुप्फुसे : मधुमेहींची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना न्यूमोनिया, क्षयरोग होण्याचे प्रमाण जास्त असते.
  • आतडी : शरीरातील अतिरिक्त साखरेचा परिणाम आतड्यांवर झाला तर पोट वारंवार बिघडणे (Diabetic Diarrhoea) किंवा बद्धकोष्ठता (Constipation) होते.
  • यकृत : मधुमेहींमध्ये यकृत अर्थात लिव्हरला सूज येऊ शकते. त्याला (फॅटी लिव्हर) Fatty Liver म्हणतात.
  • मूत्रपिंडे : मधुमेहींना लघवीमध्ये वारंवार इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे नंतर पूर्ण मूत्रपिंडामध्ये पू (Pyelonephritis) होऊ शकतो. हा गंभीर आजार आहे.
  • पाय : मधुमेहामुळे पायाच्या नसा (Nerves) दुखावल्या जातात, त्याला डायबेटिक न्यूरोपथी असे म्हटले जाते. पायाच्या संवेदना कमी झाल्यामुळे पायाला नकळत जखमा होतात. त्यामुळे पायांचे डायबेटिक फूटमध्ये रूपांतर होते. पायात खूप तीव्रतेची इन्फेक्शन्स झाली, तर सेल्यलुलायटिस (Cellulitis) म्हणून त्यावर इलाज केला जातो. अशा पायांमध्ये रक्तपुरवठा खंडित झाला, तर पाय काळा-निळा होतो. त्याला Gangrene (गँगरीन) असे म्हटले जाते. अशा जखमा किंवा गँगरीनमुळे पेशंट पाय गमावतो.
  • रक्तातील घातक कोलेस्टेरॉल वाढते आणि चांगले कोलेस्टेरॉल (HDL) कमी होते, तेव्हा त्याला डिस्लिपिडेमिया (Dyslipidemia) म्हटले जाते.

हे सर्व वाचल्यावर किंवा बघितल्यावर घाबरून जाण्याचे काही कारण नाही. कारण आपण आधीच रक्तातील साखर चांगली नियंत्रणात ठेवली, तर हे आजार होण्याची शक्यता कमी होते. मधुमेहावरच्या उपचारांबद्दलची माहिती पुढील लेखात पाहू या.

– डॉ. आशिष सरवटे, ठाणे येथील डायबेटॉलॉजिस्ट

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply