Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

एक चांगला लेखक व्यवस्थेला जागं करून तिचं रूप बदलू शकतो : डॉ. राजन गवस

Advertisements

रत्नागिरी : ‘मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी साहित्य संमेलनांवर खर्च करण्यापेक्षा जगभरातल्या वेगवेगळ्या भाषांमधलं दर्जेदार साहित्य, नोबेलप्राप्त संशोधन लगोलग मराठीत अनुवादित होण्यासाठी सरकारकडून अनुदान दिलं गेलं पाहिजे. छोटी संमेलनं जरूर व्हावीत; पण आपल्या भाषेच्या गौरवासाठी ती संमेलनं सरकारच्या निधीतून नव्हे, तर लोकांनी निधी उभारून केली पाहिजेत. सरकारचा निधी जगभरातलं तंत्रज्ञान आपल्या भाषेत आणण्यासाठी खर्च व्हावा. तसंच, सरकारने मराठी शाळा सशक्त कराव्यात,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केली. ‘एक चांगला लेखक व्यवस्थेला जागं करू शकतो. संपूर्ण व्यवस्थेचं रूप बदलू शकतो,’ अशा शब्दांत त्यांनी लेखकाच्या ताकदीची जाणीव करून दिली. (फोटो बातमीच्या शेवटी)

मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळातर्फे आज रत्नागिरीत एकदिवसीय जिल्हा साहित्य संमेलन भरवण्यात आलं आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. गवस बोलत होते. रत्नागिरीतल्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत हे संमेलन भरलं असून, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, युवा शास्त्रज्ञ डॉ. प्रतीक मुणगेकर आदी मान्यवर संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. चरित्रकार धनंजय कीर यांचं नाव संमेलनस्थळाला देण्यात आलं आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

सकाळी साडेसहा वाजता खल्वायन संस्थेच्या उषःकाल मैफलीने संमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये रत्नागिरीतल्या विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये कोकणातल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची माहिती देणाऱ्या चित्ररथांचा समावेश होता. दिवसभर विविध परिसंवाद आणि अन्य साहित्यिक कार्यक्रमांचा आस्वाद साहित्यप्रेमी घेत आहेत.

‘कोकणात इतकी उत्तुंग व्यक्तिमत्त्वं झाली आहेत, की त्यांनी मराठी साहित्याचा इतिहास संपन्न केला. मराठी साहित्याचा इतिहास लिहायचा झाला, तर तो कोकणाचाच इतिहास असेल,’ अशा शब्दांत डॉ. राजन गवस यांनी कोकणाचा गौरव केला. ‘जोपर्यंत महाराष्ट्रात श्रमिक जिवंत आहे, तोपर्यंत मराठी मरणार नाही,’ असं डॉ. गवस म्हणाले; मात्र आपण सारेच मराठीचे मारेकरी आहोत, असं सांगून त्यांनी मराठी भाषेच्या दुरवस्थेची सद्यस्थिती मांडली. ‘आपण मराठीला दैनंदिन व्यवहारातून गायब करत चाललो आहोत. म्हणी, वाक्प्रचारांचा वापर कमी झाला आहे. अनेकांची मुलं सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमात शिकतात आणि तीच माणसं मराठीबद्दल गळा काढतात. वाचन या विषयासाठी अभ्यासक्रम असला पाहिजे, हे कोणाला पटत नाही. शरद पवारांसारखा एखाद-दुसरा अपवाद वगळला, तर राज्यातला एकही नेता वाचत नाही. विकास, निष्ठा हे शब्द अलीकडच्या राजकारण्यांनी बदनाम केले आहेत. या सगळ्याचा एकूण परिणाम व्यवस्थेवर होतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे व्यवस्थेचा उकिरडा झाला आहे. मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याच्या निर्णयाला इतकी वर्षं झाली, पण त्याचा आढावा अद्याप घेण्यात आलेला नाही आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट घातला जात आहे,’ असं डॉ. गवस म्हणाले.

लेखक हा नेहमी विरोधी पक्षनेता असतो, असं डॉ. गवस म्हणाले. ‘जगणं समरसून पाहिजे. आपली भूमिका इतकी नीट वठवली गेली पाहिजे, की सत्तेला प्रश्न विचारता आलेच पाहिजेत. भ्रष्टाचार करून चांगली कादंबरी किंवा कविता लिहिता येत नाही. त्यासाठी जगणं पणाला लावावं लागतं. आयुष्य पिळवटून टाकावं लागतं. खरं बोलण्याचं धाडस दाखवावं लागतं. व्यवस्था अंगावर घेण्याची ताकद लेखकात असली पाहिजे.

लिहिणं ही तलवारीवरून चालण्याची कसरत असते. त्यावर लेखक पलीकडे गेला, तर तो समाजाला जागवू शकतो; मात्र पडला तर त्याची मान जाऊ शकते. एवढी हिंमत लेखकाने जागवावी लागते. सतत व्यवस्थेच्या त्रुटीवर बोट ठेवावं लागतं. तडजोडी करून लेखक होता येत नाही. एक चांगला लेखक व्यवस्थेला जागं करू शकतो. संपूर्ण व्यवस्थेचं रूप बदलू शकतो. एकट्या लेखकाने हे का करायचं हा प्रश्न कधीच विचारू नये. कारण आपण धोक्याच्या कडेवर उभे आहोत, कडेलोटाची शक्यता आहे. कोकणाचं पर्यावरण धोक्यात आहे. किनारपट्ट्या विकल्या गेल्या आहेत जमिनी विकल्या गेल्या आहेत. रातोरात झाडांची कत्तल होणार आहे. डोंगर, झाडं गेली, तर काय राहिलं कोकणात?’ असा सवाल डॉ. गवस यांनी उपस्थित केला.

‘प्रत्येकाने आपले व्यवहार मराठीतून करणं, आपल्या मुलांना चांगलं मराठी लिहिता-वाचता येण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. एक भाषा मरते, तेव्हा एक संस्कृती मरते, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. मराठीला काहीही होणार नाही; पण तिला मारणाऱ्यांच्या हातातले दांडे होऊ नका,’ असा सल्ला डॉ. गवस यांनी दिला.

साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ म्हणाले, की भाषा आणि साहित्य या दोन घटकांची कायमच गरज लागणार आहे. त्यांनी सांगितलं, ‘भाषा ही मानवाला मिळालेली सर्वांत मोठी देणगी आहे. तिचा वापर कसा आणि किती करायचा हे आपल्यावर अलंबून आहे. वेगवेगळ्या समाजाचं आणि संस्कृतीचं संचित ज्यात अतिशय कमी शब्दांत शब्दबद्ध केलेलं असतं, ते साहित्य. त्याच्या माध्यमातून आपण समाजाचा आणि संस्कृतीचा वेध घेतो. साहित्याचा संबंध आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी, कामाशी आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात गेलो, तरी सर्वांना आपली स्वतःची भाषा आणि समूहाची भाषा समृद्ध करता आली आणि साहित्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या समाजांशी संपर्क राहिला, तर हे जग सुखी आणि समृद्ध होण्यासाठी आपण सगळे जण या ना त्या मार्गाने हातभार लावणार आहेत. आपल्या आयुष्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. म्हणूनच अशा संमेलनांचं मी स्वागत करतो.’

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version