तळवडे (ता. राजापूर) : राजापूर लांजा नागरिक संघाचे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी तळवडे नगरी सज्ज झाली आहे.

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात छोट्या छोट्या साहित्य संमेलनांची आवश्यकता भासू लागल्यावर मध्य महाराष्ट्र ,विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात विविध प्रारूपात साहित्य संमेलने यशस्वी होत असताना बुद्धिजीवी लोकांचा प्रदेश अशी ओळख मिरवणाऱ्या कोकणात मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था अशी संमेलने आयोजित करीत असतात. त्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे नाव अग्रक्रमावर आहे. मात्र खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लेखक आणि कवींना आपले हक्काचे वाटावे, अशा संमेलनाची आवश्यकता तसेच साहित्यिकांचा अक्षरोत्सव समाजात परिवर्तन घडवू शकतो, हे लक्षात घेऊन कवी-संपादक आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी २०१५ मध्ये ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे पहिले पुष्प गुंफले. यंदा संघाचे आठवे संमेलन तळवडे (ता. राजापूर) येथील ‘गुरुवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरी’त १० आणि ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) ही दक्षिण रत्नागिरीतील अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्था असून संघाच्या यापूर्वीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवी अॅड. विलास कुवळेकर, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर, संपादक गजाभाऊ वाघदरे, नाटककार दशरथ राणे, लेखक-कवी अशोक लोटणकर या मान्यवरांनी भूषविले असून यंदा प्रकाश देशपांडे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे.
आठव्या संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला, १० फेब्रुवारी रोजी विविध प्रदर्शनांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्य दिवशी शनिवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजता नवलादेवी मंदिरापासून ग्रंथदिंडी निघेल. पारंपरिक वेशभूषेतील नागरिक, माजी सैनिक, एमसीसी विद्यार्थी, लेझीम, ढोलपथक ग्रंथदिंडीत सहभागी असेल. त्यानंतर सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. तळवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. गायत्री साळवी ध्वजारोहण, तर इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई संमेलनाचे उद्घाटन करतील. यानंतर माजी संमेलनाध्यक्ष अशोक लोटणकर आणि स्वागताध्यक्ष अप्पा साळवी मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे यांचे भाषण होईल.
दरम्यान, पुस्तक प्रदर्शन, माऊली आयुर्वेद नैसर्गिक औषधालय, पुरातन बैठे खेळ, चित्र प्रदर्शन, माय राजापूर छायाचित्र प्रदर्शन, शस्त्र प्रदर्शन, चित्रकार कुणकवळेकर चित्र प्रदर्शन, फिरता वाचन कट्टा, कोकणबाग विक्री कक्ष, अक्षरयात्रा, कौस्तुभ सुतार चित्रप्रदर्शन आदी उपक्रमांचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होईल.
साहित्यिक विचारांचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता सुरू होईल. त्यामध्ये प्रा. डॉ. राहुल मराठे (नाट्य परंपरेची ७५ वर्षे), सुनील कदम (रामचंद्र अमात्यांचे कर्तृत्व), सौ. श्रद्धा कळंबटे (कोकणच्या बंद घरांची चावी स्त्रियांच्या हाती) आपले विचार मांडतील. साहित्यिक मुशाफिरी या सदरात कवी अरुण इंगवले यांची मुलाखत धीरज वाटेकर घेतील. सायंकाळी नागेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात सुभाष लाड, अमोल रेडीज, विजय हटकर, विराज चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, समीर देशपांडे, रामचंद्र खाडे, आशा तेलंगे, प्रिया मांडवकर, लता पाटील, आकांक्षा भुर्के, डॉ. जनार्दन मोहिते, चंद्रसेन जाधव, सुहास आयरे, श्रद्धा कळंबटे आणि नितीश खानविलकर सहभाग घेतील. रात्री १० वाजता पाचल येथील शारदा कला ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल.

रविवारी (दि. १२ फेब्रुवारी) सकाळी साडेनऊ वाजता विविध पुरस्कारांचा वितरण समारंभ संघाध्यक्ष सुभाष लाड यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल. मुंबईच्या नगरसेविका सौ. समीक्षा सक्रे उद्घाटन करतील. या सत्राचे स्वागताध्यक्ष तळवडे ग्रामवाचनालयाचे अध्यक्ष मनोहर गवस असतील. यावेळी आमदार राजन साळवी, माजी बालकल्याण सभापती दुर्वा तावडे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अविनाश लाड, माजी जिल्हा परिषद सदस्य निशिगंधा सुतार, उद्योजक प्रसाद पाटोळे, माजी पंचायत समिती सदस्य भास्कर सुतार, बाजीराव विश्वासराव, कुवारबावचे ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे, आरआरपीसीएलचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागावकर, सामाजिक कार्यकर्ते विजय इंदुलकर, लांजा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक गणपत शिर्के, उद्योजक श्रीराम हांदे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

