रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या निसर्गरम्य तळवडे गावात १० ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे आधारस्तंभ आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेले प्रकाश देशपांडे या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. ‘राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई’ या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाचे हे आठवे वर्ष आहे.
कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय योगदान दिलेले प्रकाश देशपांडे मराठी साहित्य, नाट्य, ग्रंथालय चळवळीतील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत. २०१८मध्ये कोकण इतिहास परिषदेच्या वतीने महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेल्या प्रकाश देशपांडे यांनी ‘कथा एका राधेची ‘ व ‘१९४२ चिपळूण’ यासह अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांचे-पुस्तकांचे संपादन केले आहे. कुमार गंधर्व संगीत महोत्सवासह कोकणात गेल्या तीन दशकांत झालेल्या अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांचे कर्तेधर्ते अशी प्रकाश देशपांडे यांची ओळख आहे. त्या कार्यक्रमांत अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१३, शतायू ग्रंथालये, कामगार संमेलन, बोलीभाषा संमेलन, बालकुमार संमेलन, तसेच चिपळुणात सध्या सुरू असलेल्या लोककला महोत्सवाचा (२०२३) समावेश आहे. देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या आणीबाणीत त्यांनी दहा महिने कारावास भोगला. नाट्य कलाकार म्हणूनही त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाची ओळख ‘अश्रूंची झाली फुले,’ ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकांतून करून दिली आहे. चिपळुणात उभारण्यात आलेल्या व कोकणाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक पर्यटन क्षेत्राला दिशा देणाऱ्या भव्य वस्तुसंग्रहालयाच्या निर्मितीमागे त्यांची अथक मेहनत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांची आवश्यकता भासू लागल्यावर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात विविध प्रारूपात साहित्य संमेलने यशस्वी होतात. असे असताना ‘बुद्धिजीवी लोकांचा प्रदेश’ अशी ओळख मिरवणाऱ्या कोकणात मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्था अशी संमेलने आयोजित करतात. यात ‘कोमसाप’चे नाव अग्रक्रमाने येत असले, तरी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील लेखक व कवींना आपले हक्काचे वाटावे अशा संमेलनाची तीव्र आवश्यकता होती. ही जाणीव व साहित्यिकांचा अक्षरोत्सव समाजात परिवर्तन घडवू शकतो, हे लक्षात घेऊन मराठीवर निस्सीम प्रेम करणारे कवी-संपादक सुभाष लाड यांनी राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्या वतीने २०१५मध्ये कोकणात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे पहिले पुष्प गुंफले. यंदा संघाचे आठवे संमेलन तळवडे (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील गुरुवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीत होणार आहे. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही दक्षिण रत्नागिरीतील अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करणारी संस्था आहे. संघाच्या यापूर्वीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवी अॅड. विलास कुवळेकर, ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर, संपादक गजाभाऊ वाघदरे, नाटककार दशरथ राणे, लेखक-कवी अशोक लोटणकर आदी मान्यवरांनी भूषविले आहे. यंदा प्रकाश देशपांडे यांची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याने साहित्य व ग्रंथालय चळवळीत आजवर त्यांनी केलेल्या कार्याचा हा गौरव असल्याचे मत कोकणातील साहित्य-सांस्कृतिक वर्तुळातून व्यक्त केले जात आहे. विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड