चिपळूण : मनोरंजनातून लोकप्रबोधन हा सर्वच लोककलांचा मूळ गाभा असल्यामुळे केवळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे, तर डहाणूपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व कोकणातील लोककलांचे दस्तावेजीकरण होणे आवश्यक आहे, असे मत भाजपचे प्रदेश प्रवक्ते आणि ज्येष्ठ लेखक माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मैदानावर चार दिवसांचा पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव सुरू आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात आज (७ फेब्रुवारी) तिसऱ्या दिवशी ‘रत्नभूमीतील लोककला’ या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. वाचनालयाच्या कलादालन सभागृहात हा परिसंवाद पार पडला. दुर्गेश आखाडे, बाबू घाडीगावकर, रमेश सावंत आणि अमित ओक हे मान्यवर या परिसंवादात वक्ते म्हणून सहभागी झाले होते. (परिसंवादाची व्हिडिओ लिंक शेवटी दिली आहे.)
भांडारी यांनी विविध दाखले देऊन कोकणातील लोककला आणि लोकजीवनाचा, तसेच परिसंवादातील वक्त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘चिपळूणमधील या महोत्सवामुळे लोककलांचा नव्याने परिचय लोकांना होत आहे, ही चांगली बाब आहे. वास्तविक कराची ते कन्याकुमारी या भागाला सप्तकोकण म्हटले जाते. कराची आता भारतात नाही. राहिलेल्या कच्छ ते कन्याकुमारी या कोकणाचाही विचार आपण करत नाही. आताचे कोकण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गापुरते मर्यादित झाले आहे. आपण महाराष्ट्रातील डहाणूपासून वेंगुर्ल्यापर्यंतच्या विस्तारित कोकणचा विचार करू या. या साऱ्या कोकणातील संपूर्ण लोककलांचे दस्तावेजीकरण झाले पाहिजे. त्यासाठी निधी उपलब्ध करता येईल. व्ही. शांताराम यांनी १९६० साली भारतीय लोककलांचा माहितीपट तयार केला आहे. तोही समजून घ्यायला हवा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार प्रसिद्ध आहे. माझ्या आजोळी लांज्यातील नमन-खेळेही प्रसिद्ध आहेत. कोकणातील अशा सांस्कृतिक उपेक्षेचा उल्लेख परिसंवादात झाला. त्याबाबतची अनास्था त्याला कारणीभूत असते. आपण लोकांसमोर आलो तर लोक आपल्याला समजून घेतील. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तालाशिवाय लोककला यशस्वी होऊ शकत नाही. माझ्या आठवणीत पूर्वी देवगडमध्ये ‘घुमट’ वाद्य आणि खेळ होते. आता ते नष्ट झाले आहे.’
‘मच्छिंद्र कांबळी यांचे ‘वस्त्रहरण’ हे नाटक म्हणजे लोककलांचे नागरी सादरीकरण होते. अशा लोककलांचे नागरी लोकमंचावर सादरीकरण व्हायला हवे. प्रायोगिक रंगभूमीवरही लोककलांचे प्रयोग व्हायला हवेत. लोककला हे मनोरंजनापासून प्रबोधनापर्यंतचे माध्यम आहे. समाजातील अपवित्र नष्ट व्हावे, हीच लोककलांची भूमिका आहे. गेल्या चार-पाचशे वर्षांच्या राज्याच्या संघर्षात लोककलांचा मोठा वाटा मोठा आहे. प्रत्येक लोककलेचे मूळ सूत्र कायम आहे. उत्तर भारतातील रामलीला नाट्यप्रकार सोळाव्या शतकात सुरू झाला. दशावतार आणि त्यात साम्य आहे. दासबोध ग्रंथात दशावताराचा उल्लेख आहे. रामदास स्वामींना तो माहीत होता. त्याचा विचार केला, तर लोककलेचा प्रवास किमान पाचशे वर्षांचा आहे. लोककला हे प्रबोधनाचे माध्यम आहे. प्रबोधनाचे मुद्दे बदलतात, पण प्रबोधनाची गरज संपत नाही. दशावतार कलेला सूत्र आहे, संवाद नाही. तेथे प्रत्येकाच्या प्रतिभेला संधी आहे. नागरी कलेत शब्द बदलायचा अधिकार नाही. लोककलेमध्ये मात्र प्रतिभेला मुक्त वाव आहे. अलीकडे लोककलेतील अश्लीलता वाढल्याचा मुद्दा आहे; पण काळाच्या ओघात चांगले असेल तेच टिकते. अश्लीलता हा सध्याच्या काळाचा परिणाम आहे. ती लाट संपून जाईल. कारण समाजाला गैर गोष्टी फार काळ आवडत नाहीत. म्हणूनच चांगले ते टिकेल. ते काम चांगल्या पद्धतीने पुढे नेणे हे आपले काम आहे. यासाठीच अशा कलांची माहिती जतन करून ठेवण्याची गरज आहे,’ असेही भांडारी म्हणाले.

बाबू घाडीगावकर यांनी लोककलांचे बदलते स्वरूप स्पष्ट केले. ‘लोककला काल आणि आज’ या विषयावर आपले विचार मांडताना ते म्हणाले, ‘लोककला जगणे आणि जोपासणे यात फरक आहे. अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे या कला लोप पावत आहेत, याची खंत वाटते. चिपळूणच्या लोककला महोत्सवात सादर झालेल्या अनेक लोककला अनेकांना माहीतही नव्हत्या. लोककला सादर करणारी विद्यमान पिढी शेवटची आहे का, अशी शंका येते. म्हणूनच या लोककला जोपासण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. लोककलावंत जगले, तर लोककलाही टिकून राहतील. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’

रमेश सावंत यांनी प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर वापरलेल्या लोककलांचा आढावा आपल्या निवेदनात घेतला. त्यांनी सगळ्या लोककलांचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘लोककलांना शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. लोककला अनेकांनी आपल्या नाटकात, चित्रपटात वापरल्या आहेत. एकविसाव्या शतकात चटपटीत नाटकांचे प्रमाण वाढले आहे. लोकांनीही त्याला प्रतिसाद दिला. लोककला रंगभूमी डिजिटलमुळे लोकांपर्यंत आली. ती अधिक विस्तारायला हवी. आधुनिक माध्यमांचा वापर करून लोककलाही लोकांपर्यंत पोहोचवायला हव्यात.’

दुर्गेश आखाडे यांनी धनगरी नृत्यप्रकार असलेल्या गजो नृत्याविषयीची माहिती दिली. लोककला जगभर जाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, ‘चिपळूणच्या महोत्सवानिमित्ताने धनगर समाजाचे गजनृत्य लोकांसमोर आले. कोणतीही लोककला समाजाशी जोडलेली आहे. त्यातील नवीन बदल स्वीकारायला हवेत; पण मनोरंजन ते प्रबोधन असे लोककलांचे स्वरूप आहे, हेही लक्षात घ्यायला हवे. ‘आज आमच्याकडे गज, गजा, गजो आहे’ म्हणजे लोककला होणार आहे, असे अजूनही धनगर समाजात सांगितले जाते. पूर्वी हा समाज जंगलात राहायचा. वाद्याच्या आवाजाने हिंस्र प्राणी दूर जायचे, म्हणून त्यांनी वाद्यांचा वापर आपल्या लोककलेत केला. ही लोककला एखाद्या समाजापुरती न राहता ती सर्व समाजासमोर यायला हवी. लोककलावंतांना राजाश्रयही मिळायला हवा.’

अमित ओक यांनी लोककला आणि वाद्यवृंद संस्कृती याविषयी मुद्देसूद निवेदन केले. ते म्हणाले, ‘लोकसंगीतातील वाद्ये ही परंपरागत कला आहे. संतूर, सतार इत्यादी विद्या शिकण्यासाठी गुरू लागतो; पण लोककलेतील परंपरागत वाद्ये शिकायला गुरू लागत नाही, उपजत किंवा प्रयत्नांनी ती साध्य होते. म्हणून तिला कला म्हणतात. कीर्तनातील पायपेटी महत्त्वाची आहे. चर्मवाद्यातून चांगले नाद ऐकायला येतात. कोणते वाद्य कोठे वापरावे, याचेही एक सूत्र आहे. कोणतेही वाद्य कोठेही वाजवून चालत नाही. कोणत्या लोककलेत कोणती वाद्ये वापरावीत, हेही महत्त्वाचे आहे. कीर्तनात तबला, पेटी आणि चिपळ्यांचा वापर होतो.’ ओक यांनी त्या त्या कला आणि त्यामध्ये वापरली जाणारी वाद्ये यांची सविस्तर माहिती या वेळी दिली.
परिसंवादाचे सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले, तर विनायक ओक यांनी आभार मानले.
परिसंवादाचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर…
https://youtube.com/live/JBIoj8EJgzw?feature=share
(सर्व कार्यक्रमांची प्ले-लिस्ट खाली दिली आहे.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

