चिपळूण : ‘स्त्री गीते हे उपमांचे भांडार आहे; विधी, श्रम अणि खेळ या अनुषंगाने स्त्री गीतांमध्ये नृत्यही येते. ही गीते इतिहास, समाज, नाती-गोती याची महती सांगणारी असून, लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या स्त्री गीतांचा हा अनमोल ठेवा जपायला हवा,’ असा सूर ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ या परिसंवादातून उमटला.
चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मैदानावर चार दिवसांचा पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव सुरू आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात तिसऱ्या दिवशी (७ फेब्रुवारी) ‘लोककला आणि स्त्री अभिव्यक्ती’ हा परिसंवाद रंगला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थान डॉ. सूर्यकांत आजगावकर यांनी भूषविले. या परिसंवादामध्ये डॉ. गोविंद काजरेकर, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. वर्षा फाटक आदी वक्ते सहभागी झाले होते.

डॉ. निधी पटवर्धन यांनी ‘स्त्रीच्या मुळाशी असणारी वेदना तिच्या गीतांमधून दिसते,’ असे सांगितले. शरीर रंजनासाठी असले, तरी आत्मा प्रबोधनासाठी आहे. कुटुंब, वात्सल्य, प्रेम बांधून ठेवणं हे स्त्री गीतांचे वैशिष्ट्य आहे, असे सांगताना त्यांनी कोणत्या लोककलामध्ये महिलांना स्थान आहे व कोणते धार्मिक विधी-लोककलांमध्ये स्थान नाही, याची विस्तृत माहिती दिली. आज पुरुषी वर्चस्व मोडून काढण्याची अभिव्यक्ती महिला निर्माण करीत आहेत. तशीच लावणी ही लोककला पुरुष सादर करून उलटी अभिव्यक्ती होत असल्याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले.
डॉ. गोविंद काजरेकर यांनी स्त्री गीतांमधील अभिव्यक्ती नैसर्गिक असल्याचे मत मांडले. निसर्गाधिष्ट, श्रमाधिष्ट अभिव्यक्तीची रूपे आपल्याला या गीतांमधून दिसून येतात. स्त्रियांचे जगणे, कृषी संस्कृतीशी असणारे नाते दिसते. वारली समाजातील महिला चित्रांतून आपले जीवन रेखाटतात, असे सांगताना स्त्रीची प्रतिभा निसर्गाशी जोडली गेली आहे, आपण किती उच्च पातळीवरील अभिव्यक्ती निर्माण करीत आहोत, आपण उत्तम कलावंत आहोत, याची जाणीवही त्यांना नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रा. वर्षा फाटक यांनी ‘ओव्यांमधून निर्माण होणारी अभिव्यक्ती’ या विषयावर भाष्य केले. ओव्या हा लोककलेचा सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. परमेश्वराला सर्व अर्पण करण्याची यात भावना आहे. भोग, निष्कर्ष आणि चिंतन याचे समग्र दर्शन ओव्यांमधून घडते. सूर, ताल आणि लय याचे भान या महिलेला आहे. अशिक्षित असूनही सुज्ञता तिच्याकडे असल्याचे निरीक्षण नोंदविताना हे सांस्कृतिक धन मनापासून जपायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष डॉ. सूर्यकांत आजगावकर यांनी निसर्गाशी, शेती, वन संस्कृतीशी जोड असणारी लोकगीते आज शेती कमी होत असल्याने संपत चालल्याचे मत मांडले. अभिव्यक्तीने ओतप्रोत भरलेली स्त्री गीते, ओवी, यावर म्हणावे तसे संशोधन झालेले नाही. या लोककला दुर्लक्षित असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. पुरुष आणि स्त्रिया यांच्या गीतातील भेद सांगताना स्त्री गीतांमध्ये भाव, नाती, वृत्ती, प्रवृत्तीचे दर्शन घडते, असे सांगून, जगणे ही स्त्री गीतांची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले. दशावतार या लोककलेला देवाश्रय मिळाला, परंतु नमन या लोककलेला लोकाश्रय आणि देवाश्रयही मिळाला नाही. नमन ही लोककला असून दिला लोकाश्रय व देवाश्रय मिळायला हवा व याचे भान समाजाला आणि प्रशासनाला असायला हवे, अशी अपेक्षा डॉ. आजगावकर यांनी व्यक्ती केली.
या वेळी ‘लोटिस्मा’चे मार्गदर्शक प्रकाश देशापांडे, सौ. आसावरी देशपांडे, साहित्यिक, कवी अरुण इंगवले, लोककला विभागाचे प्रमुख प्रा. संतोष गोनबरे, श्री. देशमाने, शाहीर तुषार पंदेरे, लेखक धीरज वाटेकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सुनील खेडेकर, अमिता टिकेकर, राष्ट्रपाल सावंत, अंजली बर्वे, विनायक ओक, दिलीप आंब्रे, मनीषा दामले, श्रीनिवास परांजपे, प्राची गोखले, राष्ट्रपाल सावंत, श्री. दांडेकर आदी उपस्थित होते. परिसंवादाचे सूत्रसंचालन स्नेहा ओतारी यांनी केले, तर आभार दिशा रावराणे यांनी मानले.
परिसंवादाचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर…
https://youtube.com/live/oyVqo10_2zM?feature=share
(सर्व कार्यक्रमांची प्ले-लिस्ट खाली दिली आहे.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

