काळानुरूप बदल स्वीकारत लोककलांचे भवितव्य उज्ज्वल : डॉ. मुकुंद कुळे

चिपळूण : ‘नागर आणि अनागर ह्या समांतर जीवनशैली आहेत. त्या दोन्ही एकत्र चालणार आहेत. त्यांचा एकमेकांवर प्रभाव पडत राहणार आहे. नागर कलांना साचेबद्धता असते. याउलट अनागर लोककलांमध्ये गतिमानता आणि लवचीकता असते. काळानुरूप बदल स्वीकारू शकणाऱ्या या लोककलांना उज्ज्वल भवितव्य आहे,’ असे मत मुक्त पत्रकार आणि लोककलांचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी व्यक्त केले.

चिपळूण येथील श्री जुना कालभैरव मैदानावर चार दिवसांचा पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव सुरू आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्रातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात अखेरच्या दिवशी (८ फेब्रुवारी) ‘नमनाचा अनुबंध’ हा पहिला परिसंवाद झाला. त्याच्या अध्यक्षस्थानावरून श्री. कुळे बोलत होते. या परिसंवादात सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, ‘प्राचीन कोकण’चे निर्माते वैभव सरदेसाई, ‘कोकणचा बाज संगमेश्वरी साज’ या लोककला नाट्याचे प्रमुख कलावंत सुनील बेंडखळे सहभागी झाले होते.

डॉ. कुळे यांनी लोककलांच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ‘लोककला समाजाचे अनुकरण करत असतात. प्रत्येक लोककलेला स्वतःचा आकृतिबंध असतो. लोककलांचा मूळ हेतू प्रबोधनाचा असल्याचे सांगितले जात असले, तरी तो तसा नाही. दिवसभर श्रमणाऱ्यांना थोडासा विसावा मिळावा, यासाठीच लोककलांचे प्रयोजन आहे. म्हणूनच ते धार्मिक आणि सांस्कृतिक आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वीपर्यंत लोककलांचे स्वरूप धार्मिकच होते. स्वातंत्र्याच्या काळात त्यामध्ये स्वातंत्र्याविषयीच्या जनजागृतीचा अंतर्भाव झाला. स्वातंत्र्यानंतर प्रबोधनाचे हेच प्रयोजन कायम राहिले. आता त्या समाजप्रबोधनाकडे वळलेल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन ही प्राचीन आणि स्वतंत्र परंपरा आहे. ही प्रयोगात्मक लोककला रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाने जोपासली आहे. लवचीकता ही कोकणी लोककलेची खासियत आहे.’

‘लोककला पुढे टिकवायच्या असतील, तर काळानुरूप बदल करताना परंपरेनुसार काय ठेवायचे आणि काय वगळायचे, हे ठरवायला हवे; पण त्यात चकचकीतपणा नको. साधेपणा आणि नाट्यमयताही जपू या, असे आवाहन त्यांनी केले.

सुनील बेंडखळे यांनी संगमेश्वरी बोलीतच अत्यंत प्रभावीपणाने मनोगत व्यक्त करून नमनाचा प्रवास, त्यात झालेले बदल आणि पुढील काळातील बदलांचा वेध घेतला. ते म्हणाले, ‘नमनाचा विषय कोणी चर्चेसाठी घेत नाही. तो चिपळूणच्या महोत्सवात घेतला आहे, त्याचे कौतुक वाटते. नमनाच्या इतिहासाबद्दल जे सांगितले जाते, त्यानुसार सतराव्या शतकात त्याची सुरुवात झाली असावी. गोडबोले नावाचे कीर्तनकार कर्नाटकात गेले होते. त्यांनी तेथील यक्षगान पाहिले आणि ती कला आपल्याकडे आली पाहिजे, यासाठी ती कोकणात आणली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार आणि रत्नागिरी जिल्ह्यात नमन-खेळे या नावाने ती लोककला प्रसिद्ध झाली. वस्तीचे खेळे आणि फिरतीचे खेळे असे दोन प्रकार आहेत. नमनाचा कार्यक्रम पूर्वी रात्रभर चालायचा. रात्री दहा वाजता नमन सुरू झाले की गवळण मध्यरात्री एक वाजता यायची, तर रावण पहाटे पाच वाजता यायचा. या खेळ्यांमध्येही वाईटातूनही चांगले काय घ्यावे, हे सांगायचा प्रयत्न असतो. रावणाने सीतेचे हरण केले, हे खरेच; पण तो संस्कृत पंडित होता. त्याने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. हे त्याचे गुण खेळ्यांमध्ये दाखवायचा प्रयत्न होतो. गुहागर तालुक्यामधील खेळ्यांमध्ये संकासुराच्या पाया पडण्याची प्रथा आहे. ब्रह्मदेवाने बंदिस्त करून ठेवलेले वेद त्याने खेचून आणले, असे सांगितले जाते. त्यामुळेच त्याचे महत्त्व आहे. कलाकारामध्ये समयसूचकता ठासून भरलेली आहे. पुराणातील अनेक दाखले आणि ताजी उदाहरणेही खेळ्यांमधून दिली जातात. मनुष्याच्या उत्क्रांतीबाबाबत डार्विनने सांगितले होते; पण भगवान श्रीकृष्णाने गवळणींना मनुष्याची उत्क्रांतीच सांगितली होती. तेच आपण नमनात मांडत असतो.’

आता मात्र खेळ्यांमध्ये खूपच बदल झाले आहेत, असे नमूद करून श्री. बेंडखळे म्हणाले, ‘आता संगीत कमी नाट्य अधिक आहे. वेशभूषेतही खूप बदल झाला आहे. पूर्वी वीज नसतानाही खेळे होत; पण आता विजेचा झगमगाट असतो. आजचा ड्रेस, गाणी बदलत चालले आहे; मात्र मूळ ढाचा सोडून चालणार नाही.’

‘खेळ्यांमध्ये अश्लीलता हवी कशाला?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘नवीन पिढीने नमनाकडे बघताना जुन्यांचा दृष्टिकोन समजून घ्यावा. आपणच आपल्या कलेचे दूत व्हायला हवे आहे,’ असे त्यांनी सांगितले.

वैभव सरदेसाई यांनी नमनातील सोंगे आणि कथानकाची कारणमीमांसा केली. ते म्हणाले, ‘लोककलेचा समाजमनावर आणि समाजाचा कलेवर परिणाम होतो. कर्नाटकातून नमन कला आल्याचे सांगितले जात असले, तरी यक्षगान आणि नमन यात फरक आहे. रामायण-महाभारतामधील जीवनमूल्ये सामान्य माणसापर्यंत आणण्याचे काम नमनाने केले आहे. कोकणी संस्कृतीत बारा बलुतेदारांसह सारा निसर्ग एकवटला आहे. यातील काहीही वेगळे करता येत नाही. याला कोकणात गावरहाटी म्हणतात. कोकणी माणूस सकारात्मक आहे. त्याचे प्रतिबिंब नमनामध्ये दिसते. नमनाचा प्रारंभ करताना पृथ्वी, सूर्य-चंद्र, पंचमहाभूते म्हणून पांडव, सप्तर्षी, रावण, राजा, मायबाप प्रेक्षक अशा बारा जणांना वंदन केले जाते. नमनात फार्स दाखवलेला असतो. नमनात मनुष्याचे सहजीवन भेटते.’

सत्याचा अंतिम विजय निश्चित आहे, हा समज नमनातून, लोककलेतून दृढ झाला आहे. तो कायम राखण्यात लोककला यापुढेही प्रभावी राहील, असा विश्वास श्री. सरदेसाई यांनी व्यक्त केला.

युयुत्सु आर्ते यांनी ‘नमन मंडळांची चळवळ दशा आणि दुर्दशा’ हा विषय मांडला. नव्यांना नमनकलेशी जोडायचे असेल तर काही बदल स्वीकारावे लागतील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सहाशे मंडळे आहेत त्यांना एकत्र करण्याचे काम सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, ‘नमनाला राजमान्यता मिळायला हवी. नमनाच्या मंडळांना राज्यात इतरत्र प्रवास करून जायचे असेल, त्यांच्या वाहनांना टोल भरावा लागत होता. सरकारदरबारी प्रयत्न केल्यानंतर आता टोलमाफी मिळाली आहे. प्रदूषणासारख्या अनेक बाबींमध्ये प्रबोधन करताना अन्य कोणी काही सांगितले तरी ते लोकांना पटणार नाही; पण नमनातील गणपतीने स्वतः शाडूच्या मूर्तीचा विचार मांडला, तर ते लोकांना पटेल. जमिनी विकू नका, पर्यावरण टिकवा, असे संदेश नमनातूनच आम्हाला समजले. नमनात गवळणींचे सोंग पुरुषच करतात. त्यात बदल करून मुलींनाही सहभागी करून घ्यायला हवे. या विचाराला जुन्यांनी कडाडून विरोध केला; पण तरीही देवरूखमधील काही मंडळांना हा विचार पटला असून ते मुलींना सहभागी करून घेतात. असे बदल करताना जुना आशय ठेवून, जुना बाज कायम ठेवून, वेळेत बदल करून नमनाची लोककला टिकवून ठेवता येईल.’

सूत्रसंचालन प्राची जोशी केले, तर दिलीप आंब्रे यांनी आभार मानले.


परिसंवादाचा व्हिडिओ पाहा पुढील लिंकवर…

https://youtube.com/live/uetMzlxK2cA?feature=share

(सर्व कार्यक्रमांची प्ले-लिस्ट खाली दिली आहे.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply