
रत्नागिरी : आयटीच्या युगात शुद्ध विज्ञानाचा मार्गही विद्यार्थ्यांनी निवडावा. तोही करिअरच्या दृष्टीने उत्तम आहे, असे प्रतिपादन दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी केले. राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलची माजी विद्यार्थिनी गौरी गणेश सुर्वे (खेडशी, ता. रत्नागिरी) हिने आयआयटी-कानपूर येथून केमिकल इंजिनीअर (रासायनिक अभियंता) पदवी मिळवली. त्याबद्दल गौरीचा संस्था व शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी सौ. बोपर्डीकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचे यश आपल्यासमोर येते तेव्हा त्याला यशासाठी कोणते प्रयत्न करावे लागले याची माहिती उलगडत जाते. मराठी माध्यमातून शिकता का, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना तिने यश मिळवत चोख उत्तर दिले आहे. आयटीच्या युगात शुद्ध विज्ञानाचा मार्ग तिने निवडला. याकडेही आताच्या विद्यार्थ्यांना जाता येईल, हे तिने दाखवून दिले आहे.
सत्कार समारंभात गौरीचा भेटवस्तू, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गौरीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ती म्हणाली की, ‘जागुष्टे हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेतून मी ९२ टक्क्यांसह दहावी झाले. बारावीत ९१ टक्के मिळवले. मला इंग्रजीची भीती वाटली नाही, मातृभाषेवर वर्चस्व असेल तर आपण कोणतीही भाषा शिकू शकतो, हे मला शिक्षकांनी सांगितले. त्यामुळे मला शाळेचा अभिमान वाटतो. जेई ॲडव्हान्समध्ये निवड झाल्यावर भारतात ७५०० वी रॅंक मिळून आयआयटी-कानपूरमध्ये प्रवेश घेतला. तिथे नुकतेच शिक्षण पूर्ण केले. आता मला एमएस करायचे आहे. सत्काराबद्दल शाळा व संस्थेची मी ऋणी आहे.’ (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
कार्यक्रमाला संस्था सचिव राजीव गोगटे, उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, जागुष्टे हायस्कूलचे मुख्याध्यापक भास्कर झोरे, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, माजी मुख्याध्यापक श्रीकृष्ण जोशी व माजी उपमुख्याध्यापक आनंद पाटणकर, माजी मुख्याध्यापक रवींद्र इनामदार, गौरीचे आई-वडील उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. झोरे यांनी गौरीचे विशेष कौतुक करून शाळेला अशा माजी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, असे सांगितले.
सौ. रेखा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले. सुनील जाधव यांनी गौरीचा परिचय करून दिला. चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.
गौरीची यशोगाथा पुढील लिंकवर :
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

