रत्नागिरीच्या कन्येसाठी परदेशात पायघड्या; मराठी शाळेतून शिकून उत्तम गुणांनी ‘आयआयटी’तून इंजिनीअर

रत्नागिरी : निश्चित उद्दिष्ट ठेवून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. याचेच एक उदाहरण रत्नागिरीतील गौरी गणेश सुर्वे हिने घालून दिले आहे. दहावीपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेली गौरी ‘आयआयटी कानपूर’ या देशातील नामवंत संस्थेतून उत्तम गुणांनी केमिकल इंजिनीअर झाली आहे. विशेष बातमी तर पुढेच आहे. भारतासह स्वित्झर्लंड, दक्षिण कोरिया या देशांतील नामवंत कंपन्यांनी ती प्रोसेस इंजिनीअर म्हणून आपल्याकडे यावी, म्हणून लाखो रुपयांचे पॅकेज देऊ करून अक्षरशः पायघड्या घातल्या आहेत. तिला पुढे संशोधन करायचे असून, त्यासाठी जिथे अधिक चांगली संधी मिळेल, तेथील प्रस्ताव ती स्वीकारणार आहे.

गौरी ही रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील श्रीनगर येथील रहिवासी. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण कुवारबावच्या श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूलमध्ये झाले. पहिल्यापासूनच अभ्यासाची गोडी असलेल्या गौरीने २०१८ साली दहावीत ९२.२० टक्के गुण मिळवले. पुढे रत्नागिरीतीलच अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात तिने शास्त्र शाखेत प्रवेश घेतला आणि बारावीत ९०.९१ टक्के गुण मिळवले. केमिस्ट्री अर्थात रसायनशास्त्र हा तिच्या विशेष आवडीचा विषय. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘आयआयटी’मधून उच्च शिक्षण घेणे हे जवळपास प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याचे स्वप्न असते. तसेच ते गौरीचेही होते. तिने जेईई परीक्षा दिली आणि त्यात तिचा देशभरात ७५००वा क्रमांक आला. ‘आयआयटी-मुंबई’मध्ये प्रवेश मिळवण्याची तिची इच्छा पूर्ण झाली नाही; मात्र ‘आयआयटी-कानपूर’मध्ये तिला प्रवेश मिळाला. आपले अभ्यासातील सातत्य तिने तिथेही कायम राखले आणि मिळालेल्या संधीचे अक्षरशः सोने केले. पाच वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर तिला आता बीटेक + एमटेक (केमिकल इंजिनीअरिंग) अशी ड्युएल डिग्री (द्विपदवी) मिळणार असून, जानेवारी २०२६च्या अखेरीला अंतिम निकाल जाहीर होणार आहे. आतापर्यंतच्या सेमिस्टरमध्ये तिचा सीजीपीए ८.८ एवढा आहे. म्हणजेच हे गुण साधारण ८८ टक्के एवढे होतात. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

मुळात आयआयटीत ज्यांना प्रवेश मिळतो, ते गुणवंत विद्यार्थीच असतात. त्यांनी आपल्या अभ्यासातील सातत्य कायम राखले, तर तिथेही उत्तम यश मिळते आणि पुढे कॅम्पस इंटर्व्ह्यूमध्येच त्यांना चांगल्या कंपनीत उत्तम वेतनासह नोकरीची संधी मिळू शकते. गौरीनेही आपल्या अभ्यासातून तशी संधी प्राप्त केली आहे. अहमदाबादमधील बीएएसएफ, स्वित्झर्लंडमधील क्लॅरिएंट इंटरनॅशनल यासह दक्षिण कोरियातील एका नामवंत कंपनीनेही ग्रॅज्युएट प्रोसेस इंजिनीअर म्हणून गौरीला लाखो रुपयांच्या नोकरीचे ऑफर लेटर दिले आहे. गौरीला केवळ नोकरी करायची नाही, तिला अधिक संशोधन करायचे आहे. त्यामुळे आपल्याला एमएस करण्याची संधी आणि चांगली स्कॉलरशिप जिथे मिळेल ती ऑफर आपण स्वीकारणार आहोत, असे तिने सांगितले.

आपण मराठी शाळेत शिकलोय किंवा रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातून आलोय, याचा तिने कधीही न्यूनगंड बाळगला नाही. रत्नागिरीतील विजयकुमार रानडे सरांनी आपल्याला केमिस्ट्रीची गोडी लावली, असे तिने सांगितले. ‘केमिस्ट्रीतील रिअ‍ॅक्शन्स कधीही पाठ करू नका, त्या समजून घेतल्यात तर त्याचा उपयोग आहे. केमिस्ट्री फक्त लॅबपुरती मर्यादित ठेवू नका. तिचा प्रत्यक्ष उपयोग कसा करायचा हे शिकायला हवे,’ असे रानडे सरांनी सांगितले होते. त्या दृष्टीने अभ्यास केल्याचा खूप उपयोग झाल्याचे गौरीने सांगितले. अन्य शैक्षणिक संस्था आणि आयआयटी येथील शैक्षणिक वातावरणात काय फरक आहे, असे विचारल्यावर गौरीने सांगितले, की ‘आयआयटीतील वातावरण पूर्णच वेगळे आहे. तिथे दर आठवड्याला चाचण्या घेतल्या जातात आणि आपण किती समजून घेऊन अभ्यास करतो, त्यावर त्या चाचण्यांतील यश अवलंबून असते.’ तिथे अनेक मुले याच्या बरोबरीने यूपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारीही करत असतात, असेही तिने सांगितले. एकंदरीतच आयआयटीमध्ये येणारी मुले खूप ‘फोकस्ड’ असतात, असे निरीक्षण तिने नोंदवले आहे.

सध्याच्या जीवनात रसायनांचा वापर वाढला आहे. औषधांपासून कोणत्याही खतांपर्यंत जवळपास सर्वच प्रकारच्या उत्पादनांच्या निर्मितीत विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होतो आणि त्या प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात किंवा कचऱ्यातही रसायने असतात. पर्यावरणात घातक रसायने कमीत कमी प्रमाणात जावीत किंवा जाऊच नयेत, हे पाहण्यामध्ये प्रोसेस इंजिनीअरची मुख्य भूमिका असते. केमिकल इंजिनीअरिंग ही अशी शाखा आहे, की तिथे रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि तंत्रज्ञान (टेक्नॉलॉजी) अशा दोन्ही शाखांचे शिक्षण त्यात मिळते. आजच्या प्रदूषणाच्या काळात प्रोसेस इंजिनीअर्सचे महत्त्व खूपच वाढले असून, पुढच्या पिढ्यांपर्यंत पर्यावरण टिकवण्याच्या दृष्टीने तरुण प्रोसेस इंजिनीअर्सनी जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. आयआयटी-कानपूरमधील प्रा. संजीव गर्ग हे गौरीचे गाइड होते आणि त्यांनी आपल्याला या जबाबदारीची जाणीव दिल्याचे गौरीने आवर्जून नमूद केले. त्यांच्यासह तिने आतापर्यंत काही रिसर्च पेपर्सही (संशोधन निबंध) लिहिले आहेत. आयर्न मेटॅलोप्रोटीन हा औषधांमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा घटक असतो. त्यामध्ये गौरीने संशोधन केले आहे. तिच्याकडे उत्तम विश्लेषण कौशल्य असून, तिने तिच्या विषयातील पायाभूत ज्ञानही उत्तम रीतीने मिळवले आहे, असे निरीक्षण तिला ऑफर लेटर देणाऱ्या एक कंपनीने नोंदवले आहे.

केमिकल रिअ‍ॅक्शन इंजिनीअरिंग, कॅटालिसिस, हीट अँड मास ट्रान्स्फर, प्रोसेस कॅल्क्युलेशन्स या विषयांमधील कौशल्य गौरीने प्राप्त केले आहे. स्वित्झर्लंडच्या कंपनीत जायचे झाले तर जर्मन भाषा बी-टू पातळीपर्यंत शिकणे आवश्यक असते. त्यामुळे अद्याप कोणत्या कंपनीची ऑफर स्वीकारायची हे नक्की झाले नसले, तरी तिने जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली आहे. ‘यशस्वी माणसे वेगळे काही करत नाहीत; पण ती वेगळ्या पद्धतीने करतात’ असे म्हणतात. गौरीच्या उदाहरणावरून हे स्पष्ट होते. मोठे यश मिळाले असले, तरी त्यात रमून न राहता तिने आपल्या पुढच्या संशोधनाच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले आहे. असे ध्येयाने प्रेरित असलेले आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणारे अधिकाधिक केमिकल इंजिनीअर्स कोकणाच्या या भूमीतून घडले, तर कोकणात येऊ घातलेल्या रासायनिक प्रकल्पांमुळे होऊ घातलेली हानी रोखणे किंवा निदान कमी करणे शक्य होऊ शकेल, असा आशावाद गौरीच्या या यशाने दिला आहे. मन लावून, संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला, तर मराठी शाळेतून शिकलेली ग्रामीण भागातील मुलेही कुठेही कमी पडत नाहीत, याचाही वस्तुपाठ तिने घालून दिला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply