Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

संत परंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास – डॉ. प्रशांत परांजपे

Advertisements

दापोली : संतपरंपरेचा विसर पडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले.

केळशी (ता. दापोली) येथील ज्ञानविकास मंडळ वाचनालयाच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. परांजपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि श्री समर्थ दासबोधाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

साहित्य, पर्यावरण आणि युवा पिढी या विषयावर बोलताना डॉ. परांजपे यांनी मराठी साहित्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता युवकांनी सक्षमपणे सहभागी होणे काळाची गरज असल्याचे सांगितले. वाचाल तर वाचाल या न्यायानुसार निसर्गवाचन हा एक महत्त्वाचा विषय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

अभिजात दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी मातृभाषेचे रक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या निसर्गालादेखील प्रचंड असा अभिजाततेचा दर्जा आहे. तो अबाधित राखण याकरता युवकांनी मातृभाषा संवर्धन आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये अभ्यास करणे आणि कृतिशील होणे जरुरीचे आहे.

बाराव्या शतकातील लीळाचरित्रात पर्यावरण संवर्धनाचे दाखले देण्यात आले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगे महाराज या संतांची पर्यावरणाविषयीची शिकवण आम्ही विसरलो. मंदिरामध्ये तल्लीन होऊन तुकोबांचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे भजन गायले जाते. मात्र त्याचा अंगीकार करायला आम्ही विसरत आहोत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात पंचमहाभूतांचे दाखले देत त्यांच्या संवर्धनाचा संदेश दिला आहे. ज्या रामदास स्वामींनी आपल्या छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला त्या शिवरायांची पर्यावरण नीती अर्थात आज्ञापत्राचा अभ्यास आपण केला आणि प्रत्येक युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र कृतीत उतरवले तर उद्याचा भविष्यकाळ सुसह्य असेल. नाहीतर प्रचंड विध्वंसाला सामोरे जावे लागेल.

सूत्रसंचालन कार्यवाह केदार जोशी यांनी केले तर अध्यक्षीय समारोप ग्रंथालयाच्या अध्यक्ष शीला दिलीप कोठारी यांनी केला.

यावेळी उपाध्यक्ष सुभाष लाड, सदस्य.सुयोग खरे, भरत वर्तक, सल्लागार सुजाता धर्माधिकारी, पत्रकार शेट्ये, सत्कारमूर्ती श्रीमती करंदीकर, श्रीमती बोहरा, माजी ग्रंथपाल अश्विनी जोशी, रोहिणी महाजन केतकर, ग्रंथपाल स्मिता महाजन, सहाय्यक स्वप्नाली मिसाळ, रश्मी करंदीकर , दापोली तालुका वाचनालयाच्या ग्रंथपाल नेत्रा करमकर तसेच वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाराम मढव यांनी, तर सन्मानपत्राचे वाचन मंगल सणस यांनी केले श्री पेठे यांनी आभार मानले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version